विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी (ता. 20) मतदान झाले. त्यानंतर रात्री उशिरा मतमोजणी झाली. त्यात भाजपने सर्व पाचही जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले.. काॅंग्रेसचे भाई जगताप यांचा विजय झाला, तर चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे..
राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राजकीय खेळी यशस्वी झाली. काँग्रेसकडे एकूण 44 सदस्य असताना, त्यांना 41च मते मिळाली. फडणवीस यांनी काॅंग्रेसचे 3 सदस्य फोडल्याचे दिसते..
पक्षनिहाय विजयी उमेदवार
- भाजप – श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा खापरे व प्रसाद लाड
- राष्ट्रवादी काॅंग्रेस- रामराजे निंबाळकर व एकनाथ खडसे
- शिवसेना – आमशा पाडवी व सचिन आहिर
- काँग्रेस- भाई जगताप
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात होते. त्यामुळे एकाचा पत्ता कट होणार, हे निश्चित होते.. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकूण 288 पैकी 285 आमदारांनी मतदान केले. नवाब मलिक, अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदानाची परवानगी नाकारली, तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे.
आक्षेपामुळे मतमोजणीला विलंब
मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेसनं भाजप सदस्य लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. जगताप, मुक्ता टिळक यांनी मदतनीसाच्या माध्यमातून मत दिल्याचा काँग्रेसचा आक्षेप होता. काँग्रेसनं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे मतमोजणीला विलंब झाला.
पहिल्या टप्प्याची मतमोजणी झाल्यावर ‘राष्ट्रवादी’च्या रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाल्याचं स्पष्ट झालं. या मतावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता, तर भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील एक मत बाद झालं. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतासाठी 25.73 चा कोटा ठरवण्यात आला होता.
रामराजे निंबाळकर- 28, एकनाथ खडसे- 29, आमश्या पाडवी- 26, सचिन अहिर- 26, प्रवीण दरेकर- 29, राम शिंदे-30, श्रीकांत भारतीय- 30, उमा खापरे- 27 यांनी पहिल्या फेरीतच विजय मिळवला.
हंडोरे यांचा धक्कादायक पराभव
पहिल्या फेरीत काँग्रेसचे दोन्ही उमेदवार वेटिंगवर होते. चंद्रकांत हंडोरे यांना 22, तर भाई जगताप यांना 19 व भाजपच्या प्रसाद लाड यांना 17 मतं मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत जगताप यांना एकूण 26 मते, तर लाड यांना 28 मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. चंद्रकांत हंडाेरे (22 मते) यांचा धक्कादायक पराभव झाला..
काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळेच हंडोरे यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल 134 मते मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीतील अपक्षांसह काॅंग्रेस व शिवसेनेचे आमदारही भाजपच्या गळाला लागल्याचे दिसतंय. शिवसेना व काॅंग्रेससाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.
काॅंग्रेसचे दोन पैकी एकही उमेदवार पहिल्या पसंतीच्या 26 मतांचा कोटा पूर्ण करु शकला नाही. दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये भाई जगताप विजयी झाले, तर हंडोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे काॅंग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे..