मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून जगभरात महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. मागच्याच महिन्यात भारतात रिझर्व्ह बँकेने दोनदा रेपो रेट्स वाढवले आहेत, तर काल अमेरिकेत ‘फेड’ने व्याजदरवाढीची घोषणा केली आहे. यातच सगळ्या देशांमधील शेअर बाजार हा पूर्णपणे कोसळून गेला आहे. शेअर बाजासोबतच क्रिप्टो करन्सीच्या बाजारातही मोठी पडझड झाली आहे. आपल्यातील कित्येकांना Dogecoin बद्दल नक्कीच माहिती असेल. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी प्रमोट केल्यानंतर Dogecoinने वरची पातळी गाठली होती. मात्र आता Dogecoin कमालीचा खाली आहे. याच संदर्भात एका गुंतवणूकदाराने थेट मस्क व त्यांच्या कंपनीविरोधात 258 अब्ज डॉलर्सचा (जवळपास 20,136 अब्ज रुपये) खटला दाखल केला आहे.
Keith Johnson असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीनेच एलन मस्क यांच्या टेस्ला आणि स्पेस एक्स कंपन्यांविरोधात खटला दाखल केला आहे. या व्यक्तीचे Dogecoin या क्रिप्टोमध्ये बरेच पैसे गेले. त्याच्या म्हणण्यानुसार Dogecoinमध्ये ‘Crypto Pyramid Scheme’ झाली आहे. आणि हा एक मोठा घोटाळा आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. याबाबत Keith Johnson याने एलन मस्क आणि त्याच्या कंपनीविरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे.
2019 सालापासून Keith Johnson हा Dogecoinमध्ये गुंतवणूक करत होता. सगळं काही सुरळीत चालू असताना एलन मस्क यांनी Dogecoinला प्रमोट केल्यापासून त्यांना 86 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
आता Keith Johnson ला आपले पैसे मस्क यांच्याकडून परत हवे आहेत. फक्त एवढंच नाही तर नुकसान झालेल्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम देखील ते मागत आहेत. म्हणजेच, एकूण 258 अब्ज डॉलर्सची मागणी केली आहे.