‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नुकताच पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ‘राज्यसेवा पूर्वपरीक्षा-2022’साठी अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यासाठी ‘एमपीएससी’ने 24 जूनपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) (UPSC) धर्तीवर 2020 मध्ये ‘एमपीएससी’ने उमेदवारांना कमाल संधी देण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार, खुल्या गटातील (अराखीव) उमेदवारांना कमाल 6 संधी, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 9 संधी, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू नसल्याचे जाहीर केले होते.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) हा कमाल संधीचा निर्णय रद्द केला. आता त्यात फेरबदल करण्यात आला आहे. त्यानुसार, ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता पूर्वीप्रमाणेच प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे.
अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना आता कितीही वेळी परीक्षा देता येणार आहे.. मात्र, ‘एमपीएससी’च्या पूर्वीच्या कमाल संधी मर्यादेच्या नियमामुळे ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022’साठी अनेक उमेदवारांना अर्ज सादर करता आलेला नाही. अशा इच्छुक उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
‘एमपीएससी’ने शुक्रवारी (ता. 17) परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यानुसार आता ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 24 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022’साठी शुल्क भरुन अर्ज सादर करता येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.