सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन मार्ग अवलंबत असतात. आता तर सायबर ठगांनी वीज ग्राहकांना लक्ष्य केलं आहे. वीज विभागाचे कर्मचारी बनून ते आता लोकांची बँक खाती रिकामी करत आहेत. अनेक ठिकाणी अशा फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्यानंतर महावितरणने एक अॅडव्हायजरी प्रसिद्ध करून लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, ज्यांचे वीज बिल थकले आहे अशा लोकांना सायबर ठग आता टार्गेट करत आहेत आणि वीज कनेक्शन तोडण्याची भीती दाखवून त्यांच्या बँक खात्यासह वैयक्तिक माहिती मिळवून वीज ग्राहकांची फसवणूक करत आहेत.
कशी होत आहे फसवणूक?
सायबर फसवणूक करणारे लोकांच्या फोन नंबरवर एसएमएस पाठवून फसवणूक करत असून या मेसेजमध्ये तुम्ही भरलेले वीज बिल अपडेट केलेले नसते त्यामुळे तुमचं वीज कनेक्शन तोडलं जाईल, असं लिहिलं आहे. या एसएमएसमध्ये फोन नंबरही देण्यात येत असून, त्यावर संपर्क साधून बिल अपडेट करा, असं सांगण्यात येत आहे.
तर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला की फसवणूक करणारे त्याला बोलण्यात गुंतवतात. तसंच थकित वीजबिल पडताळण्याच्या बहाण्याने ते ग्राहकांना बँक खात्याचे डिटेल शेअर करण्यास सांगतात. अश्या सर्व पद्धतीने ग्राहकांची फसवणूक करतात. हि फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मॅसेजद्वारे दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास काय होईल?
मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुमचा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो. मोबाईल हॅक झाल्यास तुमच्या बँक खात्यातील सर्व रक्कम लंपास केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा बोगस मॅसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.