SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अग्निपथ योजना : मोदी सरकारकडून या योजनेबाबत 3 दिवसात तीन मोठ्या घोषणा

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेनंतर असंतोषाचा वणवा पेटला आणि त्यात मोदी सरकारचे हात चांगलेच होरपळून निघाल्याचं दिसतं आहे. अग्निवीर योजनेबाबत सध्या देशभरात सुरू असलेल्या गदारोळात सरकार विविध घोषणा करून हा संपूर्ण वाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून या योजनेबाबत अनेक घोषणा केल्या जात आहेत.

सध्या या योजनेबाबत महती सगळ्या प्रकारे पटवून देण्याचे प्रयत्न सरकारने सुरु करत असताना घोषणेनंतर पुढील तीन दिवसांतल्या सरकारच्या कृतीतून सरकार या मुद्द्यावर सावधानतेने पाऊल टाकत असल्याचं दिसतं आहे. योजनेच्या घोषणेनंतर अवघ्या तीन दिवसांत सरकारने तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

पहिले घोषणा : भरतीत अग्निवीरांसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची सूट देण्यात आली असून गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भरती झालेली नाही, त्यामुळे या काळात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हिरावली जाऊ नये यासाठी सरकारने हे तातडीचं पाऊल टाकले आहे आणि हा बदल केवळ या एकाच वर्षासाठी केला आहे.

दुसरी घोषणा : पहिल्या घोषणेनंतर त्या पाठोपाठ आज केंद्रीय गृहमंत्रालयाने एक महत्त्वाची घोषणा केली असून चार वर्षे पूर्ण केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आसाम रायफल्समधल्या भरतीत 10 टक्के जागा राखीव असतील असं देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं. शिवाय त्यांच्यासाठी वयोमर्यादेत तीन वर्षांची सवलतही जाहीर करण्यात आली आहे.

तिसरी घोषणा : चार वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या तरुणांना आयुष्यभर अग्निवीर म्हणून ओळखले जाईल. तर अग्निवीर जवानांची लष्करी सेवा संपल्यानंतर अनेक शासकीय विभागांमध्ये निवडीसाठी प्राधान्य व इतर कोणतेही काम करायचे असेल तर त्यांना स्वस्त दरात कर्जाची सुविधाही दिली जाईल. असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने उचललेलं आणखी एक मोठे पाऊल म्हणजे भरतीप्रक्रियेसंदर्भातलं, व लष्करात अग्निवीरांच्या भरतीसाठी पुढच्या दोन दिवसांत नोटिफिकेशन निघेल. व डिसेंबर 2022 पर्यंतच पहिली बॅच दाखल होईल असा दावा लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी केला.

Advertisement