एलआयसीच्या बंपर फ्लॉप आयपीओ नंतर आता डिजिटल पेमेंट कंपनी ‘फोन पे’ लवकरच बाजारात धमाकेदार आयपीओ घेऊन येणार आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये आलेले आयपीओ हे महागाईच्या चटक्यांमुळे सपशेल आपटले आहेत. अशातच आता फोन पे सारख्या कंपनीकडून गुंतवणूकदारांना बऱ्याचशा आशा आहेत. फोन पे ही वॉलमार्ट-समर्थित पेमेंट कंपनी आहे.
सध्या आयपीओद्वारे निधी उभारून आर्थिक सेवा पोर्टफोलिओ मजबूत करण्याच्या योजनेवर फोन पे काम करत असून लवकरच शेअर बाजारात ती आपली एंट्री करणार आहे. फोन पे कंपनीने एक योजना आखली आहे ज्याद्वारे एकदा कंपनीचा मूळ व्यवसाय फायद्यात आला की, कंपनी सार्वजनिक होईल.
फोन पे आता पुढच्या वर्षापर्यंत आपल्या नफ्यावर काम करणार आहे. फोन पे शेअर बाजारात येत असताना फोन पे ला मूल्यांकन 500 ते 700 अब्ज रुपये (8-10 अब्ज डॉलर) ठेवायचे आहे.
गेल्या वर्षी फोन पे चे CEO समीर निगम यांनी मीडियाला सांगितले की फर्मला कंपनीचा आयपीओ बाजारात लाँच करणार आहे. मात्र यामध्ये अजिबात घाई होणार नाही. फोन पे ची स्थापना 2015 साली झाली होती. CEO समीर निगम यांच्या नेतृत्वात फोन पे 2020 मध्ये फ्लिपकार्टवरून अंशतः वेगळा करण्यात आला होता. फोन पे कंपनीमध्ये ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टची तब्ब्ल 87 टक्के इतकी भागीदारी आहे.
वॉलमार्ट फोन पे मध्ये 10 टक्के थेट भागीदार आहे.फोन पे सध्या वाहन विमा काढण्याची जाहिरात करत आहे आणि अतिशय वेगाने या सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.