मोबाईल इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी आहे.. देशातील टेलिकाॅम क्षेत्रात नवी क्रांती होत असून, भारतात लवकरच 4G नंतर 5G इंटरनेट सेवा सुरु होणार आहे.. देशात 5G सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मोदी मंत्रिमंडळाने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिल्याचे समजते..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (14 जून) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ‘5G स्पेक्ट्रम’च्या (5G Spectrum) लिलावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पुढच्या आठवड्यात दूरसंचार विभाग या लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात करणार आहे. लिलावात 5G ‘स्पेक्ट्रम’ची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
9 स्पेक्ट्रमचा लिलाव
याअंतर्गत सरकार 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल. मोदी सरकार जुलैअखेर एकूण 72097.85 मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) नेही याआधी 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही त्यास मंजुरी दिलीय..
खरे तर दूरसंचार कंपन्या बऱ्याच दिवसांपासून ‘5G स्पेक्ट्रम’चा लिलाव करण्याची मागणी करीत होत्या.. सरकारने मंजुरी दिल्याने आता या प्रक्रियेला वेग येणार आहे. या अंतर्गत 600, 700, 800, 1800, 2100, 2300 आणि 2500 मेगा हर्ट्झ बँडचा लिलाव होणार आहे. ‘5G स्पेक्ट्रम’च्या कॉलिंग व व्हिडीओ कॉलिंगसह प्रगत सेवांची चाचणी घेण्यात आली आहे.
दिवाळीपर्यंत सुरु होईल..?
‘5G स्पेक्ट्रम’च्या लिलावात यशस्वी होणाऱ्या कंपन्यांना कोणतीही आगाऊ रक्कम भरावी लागणार नाही. लिलावाची रक्कम 20 समान हप्त्यांमध्येही भरता येणार आहे. शिवाय, या कंपन्यांना बँक हमीतूनही दिलासा देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली…
सर्व काही सुरळीत राहिल्यास यंदाच्या दिवाळीपर्यंत नागरिकांना ‘5G टेलिकॉम’ सेवेची भेट मिळू शकते. त्यामुळे मोबाईल इंटरनेट बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणार असल्याचे सांगितले जात आहे..