मुंबई :
देशभरात सध्या महागाई कमालीची वाढली आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. मागच्या सहा महिन्यामध्ये स्टील धातूचे भाव हे गगनाला भिडले होते. स्टील वाढल्यानंतर ज्यांना घर बांधायचे आहे अशांना मोठा फटका बसतो. मात्र आता घर बांधणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस परत आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. स्टीलच्या दरात आता मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
यासोबतच काही दिवसांत आणखी घसरणीची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये ज्या दराने स्टीलचे भाव वाढत होते, आता त्याच दराने ते पडायला लागले आहेत. गेल्या अडीच महिन्यांचा आराखडा लक्षात घेतल्यास स्टीलच्या बारची किंमत 15 हजार रुपयांनी कमी झाली आहे. 15 एप्रिल रोजी स्टीलच्या बारची किंमत ही 75,000 रुपये प्रति टन इतकी होती. मात्र आता ती 15 हजार रुपयांनी कमी झाली आहे. मध्यप्रदेशात आता स्टीलच्या बारची किंमत 56-57 हजार रुपये प्रति टनावर जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या लोखंडी सळ्यांना कमालीची मागणी आहे.
मागच्या काही आठवड्यांमध्ये लोखंडी सळ्यांची मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे. स्टीलच्या बारची किंमत कमी होण्यामागे पावसाळा ऋतू हे देखील कारण असू शकते. पावसाळ्यात बांधकाम कमी प्रमाणात होत असते.
पाऊस सुरु झाल्याने आता स्टीलची विक्री घटू शकते आणि त्यामुळेच भाव कमी झाले आहेत असं बोललं जातं आहे. सध्याच्या घडीला बहुतांश ठिकाणी 60 रुपये किलो दराने बार विकले जात आहेत. जरी या सर्वात कमी दर्जाच्या किंमती आहेत. पावसाळा सुरू होणार असून, हा व्यवसायासाठी फारसा मोकळा काळ मानला जात असल्याचे लोखंडी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.