एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने चिंता वाढवत असल्याने आता महागाईचा भडका आणखी उडण्याची भीती आहे. अशातच आता सामान्य नागरिकांना विजेचे चटकेही सोसावे लागण्याची शक्यता आहे. कारण आता महावितरणे विभागाकडून राज्यातील विजेच्या दरात गुपचूपपाने मोठी वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वसामान्य जनतेला महावितरणाचा मोठा शॉक दिला असून महावितरणने गुपचूपपणे विजेच्या दरात वाढ केली आहे. यासाठी महावितरणेने इंधन समायोजन शुल्काचा आसरा देखील घेतला आहे. आता वीज प्रति युनिट 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत महाग झाली असून महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने 30 मार्च 2020 ला दिलेल्या आपल्या आदेशात हे शुल्क शून्य केले होते.
काही दिवसांआधी कोळसा संकटामुळे राज्यात भीषण विजेचे संकट निर्माण झाले होते. लोडशेडिंग टाळण्यासाठी महागड्या दरावर वीज खरेदी करावी लागली. त्यामुळे अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी एफएसी वसूल करण्याची विनंती आता पुन्हा करण्यात आली आहे.
दरम्यान, आयोगाने महावितरणला तीन महिन्यांपर्यंत वसुली करण्यास मंजुरी दिली असून याअंतर्गत 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत इंधन समायोजन शुल्क वसूल करणे मागील काही महिन्यांपासून सुरु झाले आहे. विशेष म्हणजे महावितरणने नागरिकांना याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली नसून त्यामुळे आता नागरिकांकडून याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.