क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.. जगातील सर्वात मोठ्या लिगपैकी एक असलेल्या ‘इंडियन प्रीमियर लिग’ अर्थात ‘आयपीएल’चे सामने यापुढे किमान 5 वर्षे तरी ‘डिज्ने+हाॅटस्टार’वर चाहत्यांना पाहता येणार नाहीत.. त्यामुळे ‘हाॅटस्टार’चे वर्षभरासाठी ‘सबस्क्रिशन’ घेतलेल्या क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे..
‘आयपीएल’च्या टीव्ही व डिजिटल प्रसारणाचे हक्क विक्रीसाठी दोन दिवस ई-लिलाव प्रक्रिया सुरु होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ.. अर्थात ‘बीसीसीआय’ (BCCI) मार्फत 2023 ते 2027 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी ही लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात मोठे उलटफेर पाहायला मिळाले..
आयपीएल प्रसारण हक्काच्या या लिलाव प्रक्रियेतून ‘अमेझाॅन’ व ‘गुगल’ने आधीच माघार घेतली होती. त्यानंतर डिज्ने+ स्टार, सोनी नेटवर्क व रिलायन्स व्हि-काॅम-18 यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली, तर फक्त डिजिटल प्रसारणासाठीच ‘झी’ समूहाने ‘इंटरेस्ट’ दाखवला.. त्यामुळे ‘रिलायन्स’ व ‘स्टार’मध्येच खरी चुरस होती. त्यात ‘रिलायन्स’ने ‘स्टार’चा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याचे दिसत आहे..
‘बीसीसीआय’ मालामाल..
ब्रॉडकास्टींग व डिजिटल ई-लिलावातून 410 सामन्यांसाठी (5 वर्षांतील संख्या) ‘बीसीसीआय’ने तब्बल 44,075 कोटींची कमाई केलीय. पॅकेज ‘ए’ म्हणजे टीवी राइट्स 23,575 कोटींना, तर पॅकेज ‘बी’ म्हणजे डिजिटल राइट्स 20,500 कोटींना विकले गेले. टीवी राइट्समधून प्रत्येक मॅचमागे 57.5 कोटींची, तर डिजिटल राइट्समधून प्रति मॅच 50 कोटी रुपये मिळणार आहेत. टिव्ही व डिजिटल प्रसारणासाठी एका सामन्यासाठी ‘बीसीसीआय’ला 107.5 कोटी रुपये मिळणार आहेत.
2017 मध्ये ‘स्टार इंडिया’ने ‘आयपीएल’चे प्रसारण हक्क मिळवण्यासाठी जितकी रक्कम मोजली होती, त्यापेक्षा अडीच पट जास्त रक्कम यावेळी मोजावी लागली आहे. टीव्ही व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी बाजी मारल्याची माहिती समोर येत आहे..
टीव्हीचे हक्क ‘सोनी’ (Sony)ने, तर डिजिटल हक्क मुकेश अंबानी यांच्या ‘व्ही-काॅम-18’ (Viacom18) नेटवर्कने जिंकल्याचे समजते. अर्थात, ‘बीसीसीआय’कडून उशिरापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. त्यामुळे याबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम असला, तरी यापुढील काळात क्रिकेट चाहत्यांना ‘आयपीएल’ सामने ‘हाॅटस्टार’वर पाहता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे..