सध्या देशभरात महागाईने आपले चटके देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ वर्षांमधील सर्वात जास्त महागाईचा दर सध्या सुरु आहे. पेट्रोल-डिझेल, तेल, वीज यांसारख्या गोष्टी कमालीच्या महाग झाल्या आहेत. यातच लॉकडाउन नंतर सर्वसामान्यांच्या खिशाला जास्तीचे वीजबिल आल्याने कात्री लागली. वीज ही आता मूलभूत गरज झाली आहे. वीज नसेल तर घरात टीव्ही, फॅन आणि इतर वस्तू चालणारच नाही. अशावेळी अव्वाच्या सव्वा वीजबिल येणे हे कोणालाही परवडण्याजोगे नाही. जर आपल्यालाही ही वीजबिलाची समस्या असेल तर खालील गोष्टी अंमलात आणून आपण विजेची बचत करू शकता.
1. आपल्या घरात प्रकाशासाठी विविध प्रकारचे आकर्षक असे बल्ब किंवा लाईट्स असतात. कधी कधी नकळत या बल्ब किंवा लाईटमुळे विजेची जास्त युनिट खर्च होतात. नेहमीच्या बल्बऐवजी कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लाइट (CFL), लाइट एमिटिंग डायोड (LED) बल्ब वापरल्यास निश्चितच विजेची बचत होईल आणि आपल्याला वीजबिल कमी येईल.
2. आपण कित्येकदा आपला मोबाईल असेल किंवा इतर गोष्टी चार्जिंगला लावल्यानंतर तशाच ठेऊन देतो. कधी कधी तर आपण या गोष्टी चार्जिंग न लावताच विजेचे स्विच चालूच ठेवतो. डिवाईस जोडलेला नसताना चार्जर प्लग इन करून तसाच सोडण्याच्या सवयीमुळे विजेचा वापर वाढतो आणि बिलही जास्त येते. त्यामुळे नेहमी चार्जिंग झाल्यानंतर स्विच बंद ठेवावे आणि मोबाईल किंवा इतर गोष्टी जास्त वेळासाठी चार्जिंगला लावणे टाळावे.
3. फोन, लॅपटॉप यांसारख्या पॉवर सेविंग मोड असणाऱ्या गोष्टींमधून आपण विजेची बचतही करू शकतो . फोन, लॅपटॉप नेहमीच पॉवर सेविंग मोडवर ठेवल्यास अतिरिक्त वीज बचत होत. याशिवाय जेव्हा आपण टीव्ही, फ्रिज, मिक्सर, ओव्हन, वॉशिंग मशीन, फॅन आदी विजेवर चालणाऱ्या वस्तू खरेदी करताना त्या कमी वीज वापरणाऱ्या खरेदी कराव्यात.
4. एसी चालू करत असताना त्याचं तापमान 25 डिग्री ठेवा, यामुळे एसीचा कंप्रेसर सतत चालू राहणार नाही. आणि जर गरज नसेल तर एसी बंद ठेवला तर केव्हाही चांगलंच.