ग्रामीण भागातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे, शेती..! त्याला जोडधंदा म्हणून अनेक जण पशूपालन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत जनावरांच्या किंमतीही प्रचंड वाढल्या आहेत. चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गायी, तसेच म्हशींच्या किमती तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. शेळ्या, मेंढ्या व कोंबड्यांच्याही किंमती वाढल्या आहेत.
जनावरांच्या किंमतीचा भार खिशाला परवडत नसल्याने, इच्छा असूनही अनेकांना पशूपालन करता येत नाही. ही बाब ओळखून राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागातर्फे (Department of Animal Husbandry scheme) खास योजना राबविण्यात येते..
पशूपालन योजनेबाबत…
पशूपालन योजनेअंतर्गत संकरित गायी- एच. एफ. किंवा जर्सी म्हैस –मुन्हा किंवा जाफराबादी देशी गाय-गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी प्रजातीच्या पशूधनासाठी अर्थसहाय्य करण्यात येते. दोन दुधाळ गायी किंवा म्हशीसाठी हे अर्थसाहाय्य करण्यात येते..
शेळी किंवा मेंढी गट वाटप करण्याच्या योजनेअंतर्गत अंशत: ठाणबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी 10 शेळ्या किंवा मेंढ्या व 1 बोकड किंवा नर मेंढा असे वाटप करण्यात येते. एक हजार मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाच्या योजनेअंतर्गत पक्षी खरेदीसाठी लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते.
योजनेचे लाभार्थी कोण..?
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
- दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले अत्यल्प किंवा अल्प भूधारक शेतकरी, रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला सुशिक्षित बेरोजगार व महिला बचत गटातील योजनेसाठी पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- मोबाईल नंबर
- 7/12 व 8-अ उतारे (अनिवार्य)
- शिधापत्रिकेची सत्यप्रत आणि सर्व सदस्यांचे आधारकार्ड क्रमांक आवश्यक
- राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्यपत्र
- अर्जदाराचे छायाचित्र
- अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
- दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास त्याचा दाखला
लाभार्थ्यांची निवड
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थ्यांची निवड करते. लाभार्थी निवडतांना 30 टक्के महिला व 3 टक्के दिव्यांगांना प्राधान्य देण्यात येते. निवड झाल्यावर एका महिन्यात लाभार्थ्यांचा हिस्सा किंवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक राहील. दुधाळ जनावरांची खरेदी तालुक्याचे पशुधन विस्तार अधिकारी करतात.