पुष्पा : दी राईज’.. या चित्रपटाने साऱ्या देशाला वेड लावलं.. त्यातील गाण्यावर अनेकांनी ठेका धरला.. ‘पुष्पा’ अर्थात अल्लू अर्जुनचे दमदार संवाद अनेकांच्या तोंडी झाले.. सिनेमात आपल्या भारदस्त आवाजात ‘झुकेगा नही साला..’ म्हणणारा ‘पुष्पा’ (Pushpa) एका प्रकरणात अडचणीत आलाय..
एका शैक्षणिक संस्थेचं समर्थन करणारी जाहिरात अल्लु अर्जुनच्या अंगलट आली आहे. अल्लू अर्जुनने 6 जून रोजी ‘आयआयटी’ (IIT) व नीट (NEET)मधील रँकर्सची माहिती देणार्या श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेची जाहिरात केली होती. ही जाहिरात दिशाभूल करणारी असून, समाजाला चुकीची माहिती देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते उपेंद्र रेड्डी यांनी केला आहे.
समाजाची दिशाभूल करणारी खोटी जाहिरात केल्याप्रकरणी अल्लु अर्जुन याच्याविरोधात, तसंच संबंधित शैक्षणिक संस्थेच्या विरोधात उपेंद्र रेड्डी यांनी अंबरपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अल्लु अर्जुन व संबंधित शैक्षणिक संस्थेविरुद्ध खटला चालवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
याआधीही अडकलाय..
दरम्यान, याआधीही एका फुड डिलिव्हरी अॅपच्या मार्केटींग सेवेची जाहिरात केल्यानंतर अल्लु अर्जुनवर टीका झाली होती. सरकारी सेवेतील वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याऐवजी, एका खासगी वाहतूक सेवेची प्रशंसा केल्याबद्दल नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
चुकीच्या जाहिरातीत काम केल्याप्रकरणी यापूर्वीही अनेक अभिनेत्यांवर तसेच खेळाडूंवरही टीका झाली आहे. त्यांच्याविरोधात तक्रारीही दाखल झाल्या आहेत. गुटख्याची जाहिरात केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार याच्यावर काही दिवसांपूर्वीच जोरदार टीका झाली होती. त्यानंतर अक्षयने या जाहिरातीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स (Box Office) ऑफिसवरदेखील या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. अल्लू अर्जुन लवकरच ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार असल्याची माहिती मिळाली..