शालेय विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे.. उन्हाळी सुट्या संपल्या असून, विद्यार्थ्यांना आता शाळा सुरु होण्याचे वेध लागले आहेत. राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरू होणार असल्या, तरी 15 जूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाणार आहे..
राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी प्रतिबंधित लसीमुळे बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे शाळेची पहिली घंटा 15 जूनलाच वाजणार, हे नक्की.. कोरोना संसर्गाचा वेग पाहून मुलांना मास्क व इतर नियमावली दिली जाणार आहे. तत्पूर्वी मुलांच्या आरोग्यासाठी शाळांनी खबरदारी घ्यायची आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून शाळांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 13 व 14 जून या दोन दिवशी शाळेत केवळ मुख्याध्यापक, शिक्षक हजर राहणार आहेत. वर्ग खोल्यांमध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पहिल्या दिवशी या गोष्टी बंधनकारक
- ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने शाळेची स्वच्छता करून सॅनिटायझर फवारणी झाल्याची खात्री करावी.
- विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच प्राधान्य द्यावे; परिस्थितीनुसार आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना कराव्यात
- मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत पहिल्या दिवशी जेवणात गोड पदार्थ द्यावा
- मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करावे; मुलांच्या हस्ते हवेत फुगे सोडावेत.
मुलांचा प्रवेशाेत्सव
विद्यार्थ्यांना शाळेविषयी आस्था, ओढ निर्माण व्हावी, यासाठी पहिल्या दिवशी त्यांना फूल किंवा शालेय साहित्य देऊन स्वागत करावे, शाळेचा पहिला दिवस मुलांच्या प्रवेशोत्सवाचा असेल, असे निर्देश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांना दिले आहेत.
दरम्यान, विदर्भातील शाळा येत्या 27 जूनपासून सुरु होणार आहेत. तसेच, महापालिकेच्या शाळा 15 जूनपासूनच सुरू होणार आहेत. त्यापूर्वी शाळांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी कामे युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आल्या..