दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या नि त्यातून वाढलेले रस्ते अपघात रोखण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय सतत वाहतूक नियमांत बदल करीत असते. वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यातून अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी हे नियम केले जातात..
मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी वाहतूक नियमांचे काटेकाेर पालन व्हावे, यासाठी दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली होती. रस्त्यावर वाहन चालवायचं, म्हणजे वाहतूक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, अन्यथा ट्रॅफिक पोलिस कारवाईचा बडगा उगारणारच..!
पुरेशा जनजागृतीचा अभाव, बेफिकीर वृत्तीमुळे अनेक वाहनचालक सिग्नलसह रहदारीच्या अनेक नियमांना केराची टोपली दाखवतात. जरा कुठे रस्त्यावर गाड्या थांबल्या, थोडं ट्रॅफिक जॅम झालं, की हॉर्न वाजवून साऱ्यांना अगदी भंडावून सोडतात. अशा वाहन चालकांवर प्रशासनाकडून आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
हॉर्न वाजवल्यास दंड
मोटार वाहन कायदा नियम 39/192 नुसार, आता विनाकारण हॉर्न वाजवल्यास तब्बल 12 हजार रुपयांचे चालान कापले जाऊ शकते. कोणतेही वाहन चालवताना प्रेशर हॉर्न वाजवल्यास तुमच्याकडून 10000 हजार रुपये, तर ‘सायलेन्स झोन’मध्ये हॉर्न वाजवल्यास तुम्हाला अतिरिक्त 2000 रुपये, असा एकूण 12000 रुपयांचां दंड भरावा लागू शकतो.
तसेच, नव्या नियमानुसार, दुचाकी चालवताना हेल्मेट स्ट्रिप बांधलेली नसेल, तरी 1000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. सदोष हेल्मेट (BIS शिवाय) घातल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. याचाच अर्थ तुम्ही हेल्मेट घातलं, तरी त्याबाबतचे नियम न पाळल्यास 2000 रुपयांचा दंड भरावा लागेल..
असा भरा दंड
नियम मोडल्याबद्दल दंड झाल्यास, चालान भरण्यासाठी परिवहन विभागाच्या वेबसाईट https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चालानविषयी आवश्यक माहिती व कॅप्चा भरुन ‘गॅट डिटेल्स’वर क्लिक करा. नंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर येईल. त्यावर चालानचे डिटेल्स दिले जातील. तुम्हाला भरायचे असलेले चालान शोधा. चालनासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंटची पुष्टी केल्यानंतर ऑनलाइन चालान भरले जाईल.