रिझर्व्ह बँकेचे इतर सर्व बँकांच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण असते. तिला बँकांची बँक असे संबोधले जाते. अनेकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतर बँकांना व्यवहार विषयक सूचना व नियमावली जारी करत असते. बऱ्याचदा काही बँका या नियमांचे पालन करत नाही त्यामुळे मग रिझर्व्ह बँक अशा बँकांना आर्थिक दंड करते. याआधी आरबीआयने Central Bank, SBI, PNB यांसारख्या अनेक मोठ्या बँकांनाही दंड केला होता. ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 36 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
आता काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि सिंध बँकेला 27.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आणि सिंध बँकेच्या तपासणीत असे आढळून आले आहे की, बँक सूचनांचे पालन करत नाही त्यामुळे हा दंड केला आहे. या दंडाचा ग्राहकांच्या पैशावर कोणताही परिणाम होणार नाही. बँकेला कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्यात आली.
रिझर्व्ह बँकेने पुढे सांगितलं की, बँकेने नोटीसला दिलेले उत्तर तपासल्यानंतर, त्यांचे सबमिशन तोंडी ऐकून घेतल्यानंतर आणि प्रदान केलेल्या अतिरिक्त माहितीची तपासणी केल्यानंतर, निर्देशांचे पालन न केल्याचे सिद्ध झाले व बँकेवर दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.
रिझर्व्ह बँकेने पंजाब व सिंध बँकेवर केलेल्या या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. नियामक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरबीआयने बँकेवर कारवाई केली आहे. अशा स्थितीत बँकेच्या सेवेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे व चिंता करण्याचे कारण नाही.