राज्यातील शेतकऱ्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. खरीप हंगामपूर्व शेतीची कामे आटोपली असून, शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात पावसाला कधी सुरुवात होईल, तसेच पाऊस कधी येतो, त्याची लक्षणे काय, याबाबत सविस्तर माहिती दिली..
माढा तालुक्यातील मानेगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की “यंदा चांगला पाऊस होणार आहे. आज (6 जून) माॅन्सून मुंबईत, तर 7 जूनला बहुतांश महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल.. येत्या 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर, तर 22 जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस होईल…”
महाराष्ट्रात गेल्या 3 वर्षांपासून पावसाचे प्रमाण चांगले आहे.. कारण, माॅन्सून पूर्वेकडून येत आहे. माॅन्सून पूर्वेकडून येतो, त्यावेळी जास्त पाऊस होतो. यंदाही माॅन्सून पूर्वेकडूनच आला असल्याने पावसाचे प्रमाण चांगले असेल, असा दावा डख यांनी केला.
झाड जास्त, तिकडे रिमझिम पाऊस पडतो. झाडांचे प्रमाण कमी असणाऱ्या ठिकाणी रिमझीम पाऊस होत नाही. मात्र, रिमझीम पाऊस चांगला असतो. झाडे कमी असल्यास तापमानात वाढ, वादळे, गारपीट होते.. त्यामुळं सध्या झाड लावणं काळाची गरज असल्याचे डख म्हणाले.
डख म्हणाले, की शेतीसाठी, पिकासाठी शेतकरी सारं काही करतो. मात्र, निसर्गाचा फटका बसला, की पिकांचे मोठं नुकसान होतं. निसर्ग शेतकऱ्यांच्या हातात नाही.. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज समजून घ्यायला हवा. तो कशाप्रकारे जाणून घेता येईल, याबाबतही डख यांनी मार्गदर्शन केले.. ते खालील प्रमाणे..
असे ओळखा पावसाला..
- दिवस मावळताना सूर्याभोवती आभाळ तांबडे दिसलं, की तीन दिवसानंतर पाऊस येतो.
- लाईटवर किडे, पाकुळ्या आल्या की पाऊस पडतो.
- मृग नक्षत्र 7 जूनला सुरु होते. झाडावरील चिमण्या धुळीत अंघोळ करताना दिसल्यास ते पावसाचे लक्षण समजावे.
- आकाशातून विमानाचा आवाज आल्यास पुढच्या 3 दिवसात पाऊस येतो. कारण पाण्याचे ढग त्यावर असतात.
- गावरान आंबा मोठ्या प्रमाणात पिकला नाही, तर पाऊस पडतो.
- जूनमध्ये सूर्यावर तपकिरी कलर आला, की पुढच्या 4 दिवसांत पाऊस होतो.
- चिंचेला जास्त चिंचा लागतात, त्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते.
- सरड्यांनी डोक्यावर लाल कलर आणल्यास लवकरच पाऊस पडतो.
- घोरपडी बिळाच्या बाहेर तोंड काढून बसत असतील, तर पुढील चार दिवसांत पाऊस होतो.
वरील गोष्टींचे निरीक्षण केले, तरी तुम्हाला पावसाचा अंदाज येईल व नुकसान टाळता येईल. सध्या निसर्ग बदलतोय. त्यामुळं शेतकऱ्यांनीही बदलायला हवं, असं आवाहन डख यांनी केलं..