शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. पावसाळा तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी तयारी सुरु झाली आहे.. बि-बियाणे, खत-औषधांची खरेदी केली जात आहे.. जोमदार पीक घ्यायचे म्हणजे, खत हवंच.. त्यातही सर्वाधिक वापर होतो, तो रासायनिक युरिया खताचा..!
2020-21 मध्ये भारतात 661 लाख टन रासायनिक खतांची विक्री झाली. त्यात फक्त युरियाचा वाटा होता 350 लाख टनांचा.. पिकांसाठी युरियाचा सर्वाधिक वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता खराब होणे, भूगर्भातील पाण्यावर अनिष्ट परिणाम होणे, हवा प्रदूषण वाढणे, असे घातक परिणाम दिसले आहेत.
शेतकऱ्यांना दरवर्षी युरिया टंचाईचा सामना करावा लागतो.. युरिया वापराचे प्रमाण अधिक असल्याने या खताची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते नि त्यासाठी भारत सरकारला केवळ गेल्या वर्षभरात एक अब्ज डॉलरहून अधिक परकीय चलन खर्च करावे लागलेय.
शेतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या युरियाला आता पर्याय निर्माण झालाय. ‘नॅनो युरिया’ असं त्याचं नाव.. अनेक संशोधनाअंती हे द्रवरूप खत बाजारात दाखल झालंय. खताचा हा नवा प्रकार आधीच्या घन रूपातील खतापेक्षा अधिक फायदेशीर असून, त्याच्या वापरासाठी केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे..
‘नॅनो युरिया’ म्हणजे..
‘नॅनो’ म्हणजे सूक्ष्म. मोठ्या संशोधनातून युरियाचे ‘नॅनो’ रूप आकारास आले. सध्याच्या 45 किलोच्या गोणीत असेल इतका युरिया केवळ 500 मिलीच्या बाटलीतून मिळणार आहे. ‘नॅनाे युरिया’चा वापर अगदी अचूक असल्याने, शेती, जमीन, हवा, पाण्यावर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. शिवाय, युरियाच्या गोणीपेक्षाही बाटलीची किंमत कमी असल्याने खर्चही वाचणार आहे.
2019-20 मध्ये ‘नॅनो युरिया’च्या देशात 11 हजार ठिकाणी क्षेत्रीय चाचण्या घेण्यात आल्या. त्यामुळे उत्पादनात सरासरी 8 टक्के, तर शेतकऱ्यांच्या सरासरी उत्पन्नात एकरी 2 हजार रुपयांची वाढ झाली. शिवाय एकूण खत वापरात 50 टक्के बचत झाली.. हे खत भारतातच तयार होत असल्याने त्याची आयात करावी लागत नाही.
केंद्र सरकारही या द्रवरुप खताच्या वापरासाठी प्रोत्साहन देतंय.. त्यासाठी ‘इफ्को’ या ‘नॅनो युरिया’चे उत्पादन घेतले जात आहे. आतापर्यंत 3.6 कोटी बाटल्यांची निर्मिती झाली असून, पैकी 2.5 कोटी बाटल्यांची विक्रीही झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी 8 प्रकल्पांच्या उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार, हे नक्की..!