कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झालं असलं, तरी हे संकट दूर झालेलं नाही.. ते कधीही चोरपावलांनी घरात घुसू शकते.. त्यात गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचे पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून, पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची शक्यता आहे…
कोरोनाचे सावट कायम असताना, बाॅलिवूडमधून मोठी बातमी समोर येतेय.. बाॅलिवुडमधील 55 स्टार लोकांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढलंय.. दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी कोरोनासाठी ‘सुपर-स्प्रेडर इव्हेंट’ ठरलीय. कारण, याच पार्टीत सहभागी झालेल्या 55 स्टार कलाकारांना ‘कोविड-19’ची लागण झालीय.
करण जोहरच्या पार्टीत कोरोनाचा स्फोट झाला. तब्बल 55 सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याने बॉलिवूडला मोठा हादरा बसला आहे. बॉलिवूडमधील कलाकार कोरोना संसर्ग लपवत असल्याच्या चर्चा आहे.
करण जोहरची पार्टी भोवली
मुंबईतील अंधेरी वेस्ट येथील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये करण जोहरचा 50 वा वाढदिवस नुकताच मोठ्या थाटात साजरा झाला. त्यानिमित्त आयोजित पार्टीत हृतिक रोशन, शाहरुख खान, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान यांसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
1 जून रोजी कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.. अर्थात कार्तिक आर्यन या पार्टीत सहभागी झालेला नव्हता… पण त्याची सहकलाकार कियारा अडवाणी पार्टीला गेली होती. कियाराचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असला, तरी आतापर्यंत तिने कोणतीही अपडेट दिलेली नाही.
‘भुल भुलैया-2’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कार्तिक आणि कियारा ही जोडी एकत्र फिरत होती. त्याच वेळी कार्तिकला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जातं. आर्यननंतर अभिनेता खिलाडी अक्षय कुमारलाही कोरोना झाला असून, तशी माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.
अक्षय कुमारआधी अभिनेता आदित्य रॉय कपूरलाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे त्याने त्यांच्या आगामी ‘ओम: द बॅटल विदइन’ सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पुढे ढकलला आहे.
दरम्यान, याआधीही करण जोहरची पार्टी कोरोनाची ‘सुपर स्प्रेडर’ ठरली होती. ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पार्टीत करीना कपूर व अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.