दर महिन्याच्या 1 तारखेला आर्थिक क्षेत्राशी निगडीत विविध बदल होत असतात. हे बदल कधी सुखावणारे असतात, तर कधी त्याचा थेट सर्वसामान्यांच्या खिशावरच परिणाम होतो. त्यामुळे महिनाअखेर आला, की पुढील महिन्यात आपल्या पुढं काय वाढून ठेवलंय, याकडे सामान्यांचे लक्ष लागलेले असते..
महिना बदलला की हे नियम बदलतात. आता मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या 1 जूनपासून अनेक क्षेत्रांमध्ये मोठे बदल होणार आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
‘या’ क्षेत्रात होणार बदल..
होमलोन महागणार
‘एसबीआय’ (SBI)ने 1 जूनपासून त्यांचा ‘एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट’ (EBLR) 40 बेसिस पॉईंट्सने वाढवून 7.05 टक्के केला आहे, तर ‘आरएलएलआर’ (RLLR) रेट 6.65 टक्के प्लस ‘सीआरपी’ (CRP) असेल. त्यामुळे एसबीआय बँकेचे ‘होमलोन’ महाग पडू शकते.
गोल्ड हॉलमार्किंगबाबत..
‘गोल्ड हॉल मार्किंग’चा दुसरा टप्पा 1 जूनपासून सुरू होत आहे. आता 256 जुन्या जिल्ह्यांसह 32 नवीन जिल्ह्यांमध्येही ‘हॉलमार्किंग’ केंद्र सुरु केले जाणार आहे. या सर्व 288 जिल्ह्यांमध्ये दागिन्यांवर ‘हॉल मार्किंग’ बंधनकारक असेल. या जिल्ह्यांमध्ये 14, 18, 20, 22, 23 व 24 कॅरेटचे दागिने हॉल मार्किंगनंतरच विकता येतील.
मोटर विमा प्रीमियम
रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, एक हजार सीसीपर्यंत इंजिन क्षमतेच्या कारसाठी विमा प्रीमियम 2,094 रुपये असेल. 2019-20 मध्ये तो 2,072 रुपये होता. तसेच 1000 सीसी ते 1500 सीसी कारसाठी विमा प्रीमियम 3,416 रुपये असेल, जो पूर्वी 3221 रुपये होता.
गॅसचे दर
येत्या 1 जूनपासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जात असतात..
बचत खात्याचे नियम
‘अॅक्सिस बॅंकेने (Axis) बचत खात्यावरील (Savings Account) सेवा शुल्कात (Service Charge) वाढ केलीय. ‘बॅलेन्स मेन्टेन’ करण्यासाठी दरमहा सेवा शुल्कचा समावेश केला आहे. ऑटो डेबिट अयशस्वी झाल्यास हे शुल्क लागू होणार आहे. अतिरिक्त चेकबुकवरही चार्ज द्यावा लागणार आहे.