एकेकाळी भारतात दुचाकी म्हटलं की ‘राजदूत’ आणि चारचाकी म्हटलं की ‘अॅम्बेसिडर’ डोळ्यासमोर यायची. आजही जुन्या म्हाताऱ्या मंडळींमध्ये या दोन्ही गाड्यांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्यातल्या त्यात अॅम्बेसिडर म्हटलं की एक स्टेट्स सिम्बॉलचा विषय असायचा.अॅम्बेसेडर ही भारताची क्लासिक कार म्हणून ओळखली जाते. अॅम्बेसेडर ही भारतात बनलेल्या पहिल्या कारपैकी एक होती. तुम्हीही अॅम्बेसिडरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
हिंदुस्थान मोटर्सने 1958 मध्ये अँबेसिडर कारचे उत्पादन सुरू केले होते. कंपनीने 2014 पासून या कारचं उत्पादन बंद केलं. तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ ही कार भारतीय बाजारावर वर्चस्व गाजवत होती. या कारची निर्माता हिंदुस्थान मोटर्स आपले इलेक्ट्रिक वाहन भारतात आणण्याच्या तयारीत आहे. बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, हिंदुस्थान मोटर्स इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे भारतीयांची आवडती आणि लाडकी कार पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना दिसणार आहे. कंपनी नव्या अवतारात ही कार लाँच करणार आहे.
या वेळी कारच्या डिझाईनपासून ते इंजिनपर्यंत अनेक बदल करण्यात येतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. नवीन अॅम्बेसेडरला भारतात पुढील दोन वर्षांच्या आत लाँच करण्यात येईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
एका माहितीनुसार, हिंद मोटर फायनँशियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एचएमएफसीआयने नवीन कार बनविण्यासाठी फ्रेंच कार निर्माता प्यूजोसोबत करार केला आहे. आता हे दोन्ही नवीन ब्रेंड मिळून अॅम्बेसेडरच्या डिझाईन, इंजिन आणि इंटीरिअरवर काम करणार आहेत. सध्याच्या प्रस्तावानुसार, हिंदुस्थान मोटर्सचा भागीदारीमध्ये 51% हिस्सा असेल आणि युरोपियन ब्रँडचा 49% हिस्सा असेल. या भागीदारीअंतर्गत केवळ इलेक्ट्रिक कारच नाही, तर इलेक्ट्रिक टू-व्हीलरवरही लक्ष केंद्रित केले जाईल.