मुंबई :
आज बजाज कंपनीची ओळख ग्रामीणसह शहरी भागातही मायलेज देणाऱ्या गाड्या बनवणारी कंपनी अशीच आहे. भारतीय लोकांची मानसिकता ओळखून बजाज कंपनीने कमी पैशात चालणाऱ्या गाड्या बनवल्या. आजही कितीही खेड्यात गेलात तरी बजाज कंपनीची एक तरी गाडी असतेच. मात्र बजाजने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
बजाज कंपनी आता आपली सर्वाधिक मायलेज देणारी बाईक बंद करत आहे. बजाज सीटी 100 (Bajaj CT100) असं या बाइकचं नाव आहे. ही बाईक ग्रामीणसह निमशहरी भागातही खूप प्रसिद्ध झाली असताना कंपनीने घेतलेला हा निर्णय लोकांना आश्चर्यचकित करणारा आहे. महत्वाची बाब म्हणजे या बाईकचा खप म्हणजेच विक्रीही चांगली होती.
कंपनीने ही बाइक काही वर्षांपूर्वी नवीन रंग आणि अपडेटेड फीचर्ससह लॉन्च केली होती. कंपनीच्या बाइक पोर्टफोलिओमधली ही सर्वात स्वस्त बाइक होती. रिपोर्ट्सनुसार, बजाज डीलर्सनी बाइकचे बुकिंग बंद केले आहे आणि कंपनीच्या वेबसाइटवरूनही ही बाइक हटवण्यात आली आहे.
दरम्यान, कंपनीने CT100 चं प्रोडक्शनदेखील बंद केल्याचं सांगितले जात आहे. यावरून हे मॉडेल भारतातून बंद करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हे मॉडेल बंद करण्याबाबत बजाज ऑटोने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.