राज्य मंत्रिमंडळाच्या महत्वाची बैठक आज (ता. 26) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या महत्वाच्या प्रश्नावर या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, बैठक सुरु होण्यापूर्वीच मंत्रालयातील बत्ती गुल झाल्याने थोडा वेळ चांगलाच गाेंधळ उडाला…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
बैठकीतील महत्वाचे निर्णय
सारथी संस्थेला भूखंड
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेला नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37 मधील 3500 चौमी क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.
मराठा, कुणबी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी ‘सारथी’ संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत राज्यात विविध सुविधा विकसीत करण्यात येणार आहेत. मुला-मुलींच्या शिक्षणांसाठी स्वतंत्र निवासी वसतीगृहही विकसित केले जाणार आहे.
टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
राज्यातील धरणांमध्ये सध्या 36.68 टक्के पाणीसाठा आहे. सध्या टंचाईग्रस्त भागात 401 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जातो. राज्यातील जलसाठ्यांचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोणत्या विभागात किती टॅंकर सुरु आहेत, याचा आढावा घेण्यात आला..
हरभरा हमीभाव केंद्रांना मुदतवाढ
यंदा हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली. साधारणपणे राज्यात 32.83 लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असताना 8.20 लाख मेट्रिक टन वाढीव उत्पादन झाले. त्यामुळे हरभरा खरेदीसाठी हमीभाव केंद्रांना 28 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
हरभरा हमीभाव केंद्रांसाठी 29 मे पर्यंत मुदत आहे, पण लवकरच त्यास मुदतवाढ मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सध्या हरभऱ्याचे बाजारभाव 4500-4800 रुपये प्रती क्विंटल आहेत.
मास्क वापरण्याचे आवाहन
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग डोके वर काढताना दिसत आहे. मास्कसक्ती नसली, तरी नागरिकांनी मास्कचा वापर सुरु करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राज्याची साप्ताहिक ‘पॉझिटीव्हीटी’ 1.59 टक्के असून, पुण्या-मुंबईत राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळत असल्याचे सांगण्यात आले..