मुंबई :
शिवसेना नेते व धर्मवीर नावाने अखंड महाराष्ट्राला परिचित असणारे आनंद दिघे यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित होऊन आता दहा दिवस झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी मराठीत एक ब्लॉक बस्टर सिनेमा आल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत रंगली आहे. अवघ्या 10 दिवसात या मराठी सिनेमाने तब्बल 18.3 कोटींची कमाई केली आहे. भले भले स्टार असलेल्या हिंदी सिनेमांनीसुद्धा आनंद दिघे यांच्या वरील धर्मवीर या मराठी चित्रपटासमोर कात टाकली.
अगदी पहिल्याच दिवसापासून धर्मवीरची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. ‘धर्मवीर’ने पहिल्याच आठवड्यात 13.87 कोटींची कमाई केली आहे. केवळ ठाण्यानेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राने ‘धर्मवीरांचा जय महाराष्ट्र’ प्रेमानं स्वीकारला आहे.
हा सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे तर आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक यांनी केली आहे. हुबेहूब आनंद दिघे दिसणाऱ्या प्रसाद यांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा 13 मे ला शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.
पहिल्याच दिवशी या सिनेमाने जी कमाई केली, ती अविश्वसनीय होती. 2.5 कोटींची कमाई धर्मवीरया अस्सल मराठमोळ्या चित्रपटाने केली तीही पहिल्याच दिवशी. एवढी विक्रमी सुरुवात करत या चित्रपटाने पुढच्या 3 दिवसांत 9.59 कोटींची कमाई केली. प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहत आहेत.