‘व्हॉट्स ॲप’… इन्स्टंट मेसेजिंग ॲप.. जगात सर्वाधिक वापरले जाणारे ॲप.. एक सोशल मीडिया ॲप म्हणून सुरुवात केलेल्या ‘व्हॉट्स ॲप’ने नंतर आपल्या युजर्ससाठी विविध सेवा सुरु केल्या. त्याचा युजर्सना चांगला फायदा होत आहे..
मार्च-2020 मध्ये ‘व्हॉट्स ॲप’वर ‘माय जीओव्ही हेल्प डेस्क’ (पूर्वीचे ‘माय जीओव्ही कोरोना हेल्प डेस्क’) सुरु करण्यात आले होते. त्या माध्यमातून नागरिकांना कोरोनाबाबत विश्वासार्ह माहिती देणे, लसीकरणासाठी नोंदणी करणे, तसेच कोविड लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करता येत होते..
कोरोनाचा कहर सुरु असताना, ‘व्हॉट्स ॲप’च्या या सुविधेचा नागरिकांना मोठा लाभ झाला.. ही बाब लक्षात आल्यानंतर आता नागरिकांना सरकारी सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, सर्वसमावेशक, पारदर्शक नि सुलभ सेवा मिळाव्यात, यासाठी ‘व्हॉट्स ॲप’च्या या सुविधेची पुन्हा एकदा मदत घेतली जाणार आहे..
‘व्हॉट्स ॲप’वर ‘डिजी-लॉकर’
‘व्हॉट्स ॲप’वरील ‘माय जीओव्ही हेल्प डेस्क’च्या माध्यमातून नागरिकांना आता ‘डिजी-लॉकर’ (Digilocker)ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तशी घोषणा ‘माय जीओव्ही मंचा’ने केली.. या सुविधेमुळे ‘डिजी-लॉकर’ खात्याचे प्रमाणीकरण, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व अन्य डिजी-लॉकर कागदपत्रे ‘व्हॉट्स ॲप’वरुन डाउनलोड करता येणार आहेत.
प्रशासन व सरकारी सेवा एका क्लिकवर आणण्याच्या दिशेने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. या सेवेमुळे नागरिकांना आपली महत्वाची कागदपत्रे घरबसल्या सुरक्षित, सहजपणे हाताळता येतील. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, जीवन विमा- दुचाकी व विमा कागदपत्रे सुरक्षित ठेवता येणार आहेत.
असा घ्या लाभ..
‘डीजी लॉकर’वर आतापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केली असून, 5 अब्जापेक्षा जास्त कागदपत्रे वितरित केली आहेत. ‘व्हॉट्स ॲप’वर ‘नमस्ते, हाय किंवा ‘डीजी लॉकर’ असा मेसेज +91 9013151515 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवून तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.