मोदी सरकारनंतर राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले असले, तरी पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलेले नाही. त्यात तुमची बाईक चांगले ‘मायलेज’ देत नसल्यास, खिशाला नाहक भुर्दंड बसतो. वाढत्या महागाईत हजारो रुपये पेट्रोलवरच खर्च होत असल्याने घर चालवणे अवघड होते.
खरं तर बऱ्याचदा आपल्या निष्काळजीपणामुळेच गाडीचे मायलेज कमी होते. बाईकचे मायलेज वाढवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
गाडीचं ‘मायलेज’ असं वाढवा..!
नियमित सर्व्हिस : ठराविक अंतराने गाडीची सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. सर्व्हिसिंगमुळे इंजिन नि गिअर बॉक्सला भरपूर वंगण लागते. त्यामुळे इंजिनचे व्हॉल्व्ह व गिअर बॉक्स व्यवस्थित काम करतात व चांगले मायलेज मिळते..
टायर प्रेशर : नेहमी बाइकच्या टायरमधील हवेचा दाब नक्की तपासा. कारण, कंपनीने दिलेल्या दाबानुसार तुमच्या बाइकच्या टायरमधील हवा नसल्यास त्याचा थेट परिणाम बाइकच्या मायलेजवर होतो.
सिग्नलवर गाडी बंद करा : प्रवासादरम्यान लाल सिग्लनवर 15 सेकंद असो वा 1 मिनिटासाठी गाडी बंद करायला हवी. दिवसभरात अनेक सिग्नलला इंजिन बंद केले, तर इंधन कमी जळेल व मायलेज वाढेल.
क्लच-गियरचा योग्य वापर : बाइक चालविताना क्लचचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण क्लचच्या अतिवापरामुळे बाइकच्या मायलेजवर परिणाम होतो.
गरजेनुसार गिअर बदला : गाडीच्या वेगानुसार गिअर बदलणे गरजेचं असतं. तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या गिअरमध्येही कमी वेगाने गाडी चालवली, तर त्याचा थेट परिणाम बाइकच्या मायलेजवर होऊ शकतो..
ट्रॅफिकची माहिती घ्या : ऑफिस वा घरातून बाहेर पडण्यापूर्वी स्मार्टफोनमध्ये ट्रॅफिकची माहिती घ्या.. जेणेकरून तुम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकणार नाहीत. बाईकचे बहुतांश ऑईल ट्रॅफिक जॅममध्ये जळते व मायलेज कमी होते..