वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेकदा ट्रॅफिक पोलिस केवळ संशयाच्या आधारे कुठेही गाडी थांबवून वाहनाची तपासणी करतात. त्याचा रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होतो. ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसते. मात्र, आता तसे होणार नाही..
याबाबत सरकारने नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार, ट्रॅफिक पोलिस आता उगाचच वाहनचालकांना थांबवू शकत नाहीत, तसेच कोणतेही कारण नसताना तुमच्या गाडीचे चेकिंग करू शकत नाहीत. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. कमिश्नर ऑफ पोलिस हेमंत नगराळे यांनी ‘ट्रॅफिक डिपार्टमेंट’ला तसे पत्रक जारी केलं आहे.
फक्त वाहतुकीवर लक्ष द्या..
या पत्रकानुसार, आता ट्रॅफिक पोलिसांना वाहनांची तपासणी करता येणार नाही. विशेषत: चेक नाक्याच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करता येणार नाही.. तेथे फक्त वाहतूक सामान्यपणे सुरू राहिल, यावर पोलिस लक्ष देतील. ट्रॅफिकच्या वेगावर परिणाम होत असेल, तरच पोलिस एखादी गाडी थांबवू शकतात, असं या आदेशात म्हटलं आहे..
वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिसांच्या संयुक्त नाकाबंदी दरम्यान, वाहतूक पोलिस केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतील. वाहनांची तपासणी करणार नाहीत. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास संबंधित वाहतूक चौकीचे वरिष्ठ निरिक्षक त्यासाठी जबाबदार असणार आहेत..
रस्त्यावरील वाहतूक वाढल्याने वाहन तपासणी बंद करावी, वाहतुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास प्राधान्य देण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून मोटर वाहन कायद्यातील तरतुदींनुसार दंड आकारला जाऊ शकतो, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.