गुटखा व पान मसाल्याची जाहिरात केल्याप्रकरणी बॉलीवूडमधील स्टार अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या या बड्या-बड्या अभिनेत्यांवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका होत होती. मात्र, आता हे प्रकरण कोर्टात गेले असून, त्यात प्रामुख्याने 4 बड्या स्टार्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पान मसाला व गुटख्याचे प्रमोशन केल्याप्रकरणी बाॅलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण व रणवीर सिंग यांच्या विरोधात बिहारच्या कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. मुजफ्फरपुरमधील सामाजिक कार्यकर्ता तमन्ना हाश्मी यानं या स्टार्सविरोधात कोर्टात याचिका दाखल केलीय.
गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर वरील स्टार्सची एका कंपनीच्या पानमसाल्याची जाहिरात पाहायला मिळते. मात्र, अनेकांना हा प्रकार पसंत पडला नाही. सोशल मीडियावर या बड्या-बड्या कलाकारांबाबत चांगलेच ताशेरे ओढले गेले. या वादात भर पडली, ती अक्षय कुमारनेही पानमसाल्याची जाहिरात केल्यानंतर..
अक्षयला पानमसाल्याची जाहिरात करताना पाहून लोकांचे जणू पित्तच खवळले. अक्षयला खूप ऐकावं लागलं. त्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांची माफी मागत, या जाहिरातीतून बाहेर पडत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केलं.. तसेच जाहिरातीसाठी घेतलेले सगळे पैसे सामाजिक कामासाठी दान करणार असल्याचंही सांगून टाकलं होतं..
अमिताभ बच्चन यांचाही तंबाखू उत्पादक कंपनीसोबत असलेला करार गेल्या वर्षीच संपला आहे. त्यानंतर बच्चन यांनीही निवेदन सादर करुन माहिती दिली. मात्र, त्यांच्या डोक्यावरही टांगती तलवार कायम आहे. मात्र, यासंदर्भात अजय किंवा शाहरुख यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही..
आता हे प्रकरण कोर्टात पोहोचलंय.. मुजफ्फरपुरमधील सामाजिक कार्यकर्ता तमन्ना हाश्मी याने बिहारच्या कोर्टात रणवीर सिंग, अजय देवगण, शाहरुख खान व अमिताभ यांच्या विरोधात केस दाखल केलीय.
तक्रारीत काय म्हटलंय..?
पैशांच्या लालसेपोटी चारही कलाकार आपल्या प्रसिद्धीचा गैरवापर करीत आहेत. लहान-थोर सारेच या कलाकारांना ‘फॉलो’ करीत असतात. मात्र, हे कलाकार पानमसाल्याची जाहिरात करुन चाहत्यांचे आयुष्य धोक्यात आणत आहेत.. त्याचा सर्वात मोठा परिणाम लहान मुलांवर होईल, तेही लहान वयात पानमसाल्याचे सेवन करायला लागू शकतात, असं या तक्रारीत म्हटलं आहे.
दरम्यान, तमन्ना हाश्मी यांनी दाखल केलेल्या या केसवर येत्या 27 मे रोजी सुनावणी होत असून, बिहार कोर्टाच्या निर्णयाकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.