भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू व काॅंग्रेसचे पंजाबमधील मोठे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना 34 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supream court) 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 34 वर्षांपूर्वी सिद्धू व त्यांच्या मित्राच्या मारहाणीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला हाेता.. गुरनाम सिंग असं मृताचं नाव आहे.
नेमकं काय झालं होतं…?
27 डिसेंबर 1988 रोजी ही घटना घडली होती. पंजाबमधील पटियाला येथे रस्त्याच्या मधोमध सिद्धूने त्याची ‘जिप्सी’ गाडी पार्क केली होती. या रस्त्याने 65 वर्षीय गुरनाम सिंग व अन्य दोन जण बँकेत पैसे काढण्यासाठी जात होते.
रस्त्याच्या मधोमध लावलेली जिप्सी त्यांनी सिद्धूला (Navjot Singh Sidhu) बाजूला घेण्यास सांगितले. त्यातून त्यांच्यात मोठा वाद झाला. रागाच्या भरात सिद्धू व त्याच्या मित्राने गुरनाम सिंग यांना बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या मारहाणीनंतर सिद्धू यांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याचा आरोप पोलिसांनी केला होता..
दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने सप्टेंबर 1999 मध्ये सिद्धूची निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी पंजाब-हरियाणा हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने डिसेंबर 2006 मध्ये सिद्धू व त्याच्या मित्राला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवताना 3 वर्षांची शिक्षा सुनावली. या निर्णयाला सिद्धूने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूची सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतून मुक्तता केली, मात्र मारहाणीच्या गुन्ह्यात एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध मृताच्या नातेवाईकांनी ‘रिव्हू पिटीशन’ दाखल केली. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सिद्धूला 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.