मोबाईल रिचार्ज असो, वा वीजबिल भरायचे.. कोणाला पैसे पाठवायचे असतील वा घ्यायचे.. स्मार्टफोनमुळे अगदी काही क्षणातच हे काम अगदी घरबसल्या करता येते. मोदी सरकारही सध्या डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देते. त्यासाठी स्मार्टफोनमध्ये फोन-पे, पेटीएम, गुगल-पे असे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत.
भारतातील लोकप्रिय नि सुरक्षित अॅप म्हणजे ‘गुगल-पे’.. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘गुगल’ (Google Pay ) नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असते. भारतातील मोठा ग्राहक वर्ग डोळ्यासमोर ठेवून ‘गुगल फॉर इंडिया’ने नुकतीच एका भन्नाट फिचरची घोषणा केलीय. याबाबत जाणून घेऊ या…
सध्या मोठ्या प्रमाणात ‘ऑनलाईन पेमेंट’ केले जाते. मात्र, आता ते आणखी सोपे होणार आहे.. त्यासाठी ‘गुगल- पे’ने एक खास फिचर आणले आहे.. विशेष म्हणजे, या फिचरमुळे तुम्हाला अॅप उघडण्याचेही कष्ट घ्यावे लागणार नाहीत. कोणत्याही मशिनने स्मार्टफोनला फक्त ‘टच’ केलं, तरी काही सेकंदात पेमेंट होणार आहे..
‘पाईन लॅब’च्या सहकार्यानं ‘गुगल पे’नं हे फीचर आणलंय, जे ‘युपीआय'(UPI)साठी ‘टॅप टू पे’ (Tap to pay) पद्धतीद्वारे वापरता येते.. आतापर्यंत ‘टॅप टू पे’ हे फिचर फक्त डेबिट व क्रेडिट कार्डवरच उपलब्ध होते. मात्र, आता ‘गुगल-पे’साठी ते वापरले जाईल. ‘युपीआय’ पेमेंटसाठी ‘टॅप टू पे’ फीचर वापरण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘एनएफसी’ सुविधा आहे की नाही, हे तपासा. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा..
- सर्वप्रथम अॅड्रॉइड स्मार्टफोनवर सेटिंग्जमध्ये जा.
- बहुतेक स्मार्टफोनमध्ये ‘कनेक्शन’ सेटिंग्जमध्ये ‘एनएफसी’ फिचर उपलब्ध असते. त्यातील ‘एनएफसी’ आणि ‘कॉन्टॅक्टलेस पेमेंट’ पर्यायावर क्लिक करा.
- शोध परिणामांमधूनही तुम्ही हे फीचर अॅक्टिव्ह करू शकता.
पेमेंट कसे होणार..?
- सर्व प्रथम फोन अनलॉक करा, त्यानंतर पेमेंट टर्मिनलवर ‘फोन टॅप’ करा
- गुगल-पे आपोआप उघडेल.
- देयक रकमेची पुष्टी करा नि ‘पुढे जा’वर टॅप करा.
- पैसे हस्तांतरित झाल्याची माहिती दिसेल.
‘रिलायन्स रिटेल’साठी सुरुवातीला ही सुविधा सुरू करण्यात आली होती. आता ‘फ्युचर रिटेल’, ‘स्टार बक्स’ आणि इतर व्यापाऱ्यांकडेही ती असणार आहे. या फीचरबाबत माहिती देण्यासाठी ‘गुगल’ने एक हेल्प पेज लॉंच केलंय. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार आहे.. शिवाय पेमेंटसाठी हे फिचर सुरक्षित असल्याचाही दावा केला जात आहे..