दिल्ली :
दिल्लीतील मुंडका येथील एका तीन मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती अग्निशमन दलाला दुपारी 4.40 च्या सुमारास मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 8 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सीसीटीव्ही तयार करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात आग लागली. तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय होतं.
अग्निशमन दलाचे अधिकारी अतुल गर्ग यांनी या आधी शुक्रवारी रात्री 10 वाजता माहिती देत सांगितलं होतं की, ‘तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. आगीमध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही आग इतकी भीषण होती की सुमारे आठ तास आग आणि धुरांचे लोट सर्व परिसरात पसरले होते. यानंतर एनडीआरएफच्या पथकालाही बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले.’ यानंतर बचाव पथकाला रात्री एक वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
आठ तासांहून अधिक वेळ ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. दरम्यान इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरूण गोयल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आगीप्रकरणी कारखाना मालकांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या आगीची चौकशीची करण्यात येणार आहे. दिल्लीतील मुंडका येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफएसएलची टीम घटनास्थळी जाणार आहे. एफएसएल टीम आगीचे कारण शोधून काढेल.