राज्यातील विद्यार्थी-पालकांसाठी महत्वाची बातमी आहे.. दहावीतील मार्कांवरच अकरावीचे प्रवेश होतात. त्यात अनेकदा विद्यार्थ्यांना पसंतीचे काॅलेज मिळत नाही.. त्यामुळे अनेक जण अकरावीला मिळेल त्या काॅलेजला प्रवेश घेत, मात्र बारावीला डोनेशन भरुन मनपसंत काॅलेजमध्ये प्रवेश घेत असल्याचे दिसते..
गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरु होता.. मात्र, आता यापुढच्या काळात विद्यार्थी-पालकांची अशी बनवाबनवी चालणार नाही.. कारण हा प्रकार लक्षात आल्यावर शिक्षण विभागाने त्यावर मोठा निर्णय घेतला आहे..
नवा नियम काय..?
बारावीला आता सहजासहजी पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार नाही.. अकरावी झाल्यानंतर बारावीला काॅलेज बदलण्यासाठी आता शिक्षण उपसंचालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय बारावीला कॉलेज बदलताना रास्त कारण द्यावं लागणार आहे. ठराविक कारणांसाठीच आता कॉलेज बदलायची मुभा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना ज्या काॅलेजमध्ये बारावीला प्रवेश घ्यायचा आहे, त्या कॉलेजचं ‘ना हरकत’ प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. तसेच कॉलेज बदलासाठी शिक्षण उपसंचालकांची मान्यता लागेल. विद्यार्थ्यांचे कारण रास्त असेल, तरच त्याला कॉलेज बदलण्यासाठीची परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयास विद्यार्थ्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठवावा लागणार आहे.
कधी काॅलेज बदलता येणार..?
– विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असलेलं कॉलेज घरापासून लांब असल्यास..
– नोकरदार पालकांची बदली झाली असल्यास..
– वैद्यकीय कारणास्तव जवळचं कॉलेज मिळण्यासाठी शाखा बदलून देणे
– विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलला असल्यास
– बारावीमध्ये विद्यार्थ्याला बोर्ड बदलून घ्यायचा असेल..
वरील कारणांसाठीच बारावीला कॉलेज बदलून मिळत असे, पण बारावीला कॉलेज बदलून घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, त्यामुळे आता ही कारणेही पडताळून घेऊनच विद्यार्थ्यांना परवानगी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले..