जून महिना जस जसा जवळ येतोय, तशा शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. हवामानाचा अचूक अंदाज सांगण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेनेही नुकताच यंदाच्या माॅन्सूनबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे..
स्कायमेटच्या अंदाजानुसार, देशात यंदा सरासरीच्या 98 टक्के माॅन्सून बरसणार असल्याचे म्हटले आहे. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे. त्यानुसार देशात सलग चौथ्या वर्षी सामान्य किंवा त्यापेक्षा चांगला माॅन्सून राहणार असल्याची शक्यता ‘स्कायमेट’ने व्यक्त केली आहे.
भारतात माॅन्सून येण्याची सामान्य तारीख 1 जून असल्याचे म्हटलं जातं. मात्र, यंदा 26 मे 2022 रोजी केरळमध्ये माॅन्सून दाखल होईल.. असं ‘स्कायमेट’चं म्हणणं आहे.. केरळमध्ये नैऋत्य माॅन्सूनची सुरुवात मुख्यत्वे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरील समुद्राच्या परिस्थितीवर अवलंबून असते..
बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्यामुळे माॅन्सूनचा प्रवाह लवकर बंद झाला. ‘असनी’मुळे अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागावरील प्रतिचक्रीवादळ नष्ट झाले. जे माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक ठरले आहे. केरळमध्ये माॅन्सूनपूर्व पाऊसही यंदा चांगला असेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ने व्यक्त केला आहे.
‘स्कायमेट’ने यापूर्वी 21 फेब्रुवारी रोजी, त्यानंतर 14 एप्रिलला माॅन्सूनबाबत दुसऱ्यांदा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळीही स्कायमेटने यंदा भारतात माॅन्सुन (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. आता स्कायमेटकडून तिसऱ्यांदा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यातही चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केलीय..
‘स्कायमेट’बद्दल…
हवामान अंदाज व कृषी जोखीम उपाय सूचवणारी ‘स्कायमेट’ ही एक आघाडीची भारतीय खासगी कंपनी आहे. 2003 मध्ये ही संस्था सुरु झाली. तेव्हापासून सतत हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. ‘स्कायमेट’चे स्वतःचे अंकीय हवामान अंदाज मॉडेल असून, विविध माध्यमांद्वारे हवामानाबाबत अंदाज व्यक्त करीत असते..