‘पीयूसी’.. अर्थात ‘पाेल्युशन अंडर कंन्ट्रोल’.. तुमच्या वाहनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, याची हमी देणारे सरकारी प्रमाणपत्र.. दुचाकी असो वा चार चाकी, प्रवासादरम्यान हे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं बंधनकारक आहे.. विना ‘पीयूसी’ गाडी चालवताना आढळल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
प्रत्येक वाहनधारकाला आपल्या गाडीची ‘पीयूसी’ (PUC) चाचणी करावीच लागते.. वाहनांमधून जास्त प्रदूषण होत नाही ना, यासाठी ही चाचणी केली जाते. प्रत्येकालाच ते बंधनकारक असते..
दरम्यान, वाहनांच्या ‘पीयूसी’बाबत मोठी बातमी समोर येत आहे. देशात महागाईचा भडका उडालेला असताना, आता दुचाकी व चार चाकी गाड्यांची ‘पीयूसी’ (Pollution Under Control) चाचणी करणंही महागलं आहे.. या चाचणीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. इंधन दरवाढीने आधीच हैराण झालेल्या वाहनधारकांसाठी हा मोठा झटका आहे..
राज्यातील वाहनांच्या ‘पीयूसी’ चाचणीच्या दरांत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी दिली. सुधारित दर तात्काळ अंमलात येत असून, प्रत्येक गाडीच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी ते देय राहतील, असं जायभाये यांनी नमूद केलं..
दरात किती वाढ..?
– दुचाकीच्या ‘पीयूसी’ चाचणीसाठी याआधी 35 रुपये खर्च येत होता. आता त्यासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
– पेट्रोलवर चालणाऱ्या तीन चाकी वाहनासाठी 70 रुपये लागत होते, पण आता त्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील.
– सीएनजी, एलपीजी (LPG)वर चालणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी आधी 90 रुपये द्यावे लागत होते..पण, आता या वाहनांच्या ‘पीयूसी’ चाचणीसाठी 125 रुपये मोजावे लागतील.
– तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना आधी 110 रुपये खर्च येत होता, पण आता नव्या दरांनुसार 150 रुपये लागणार आहेत.
दरम्यान, इंधन दरवाढीमुळे आधीच वाहनधारक वैतागले आहेत. त्यात आता ‘पीयूसी’ चाचणीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याने वाहनधारकांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळते..