मुंबई :
राजकीय वर्तुळातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Ramesh Latke Death) झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार लटके हे सहपरिवार दुबईला होते. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लटके यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. लटके यांच्या निधनाचं वृत्त कळताच स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली.
आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाईल. लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशी माहितीही मिळत आहे. सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी, “आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती दिलीय.
आमदार रमेश लटके हे 1997 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.