मुंबई :
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संतूर या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे आज 10 मे रोजी निधन झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पंडित शिवकुमार हे 84 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें.
पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय तसेच, आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 1985 मध्ये बाल्टीमोर, संयुक्त राज्यची मानद नागरिकता सुद्धा मिळाली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांना सन 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला ,सन 1991 साली पद्मश्री, तसेच 2001 मध्ये पद्म विभूषण या सन्मानानं पंडितजी यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीत विश्वात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय सिनेसंगीतातही फार मोठी कामगिरी बजावली आहे. या जोडीने अनेक सिनेमांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (1985), ‘चांदणी’ (1989), ‘लम्हे’ (1991), ‘डर’ (1993) या सिनेमांनाही संगीत दिलं.