मुंबई :
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘असनी’ चक्रीवादळ 25 किलोमीटर प्रतितास वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत हळूहळू कमकुवत होईल, असा अंदाज आहे. सोमवारी पहाटे त्याचे मोठ्या वादळात रूपांतर झालेले असेल आणि तेव्हा चक्रीवादळाची गती 110 किमी प्रतितासापेक्षा जास्त होईल. बुधवारी रात्रीपासून त्याची तीव्रता कमी होण्यास सुरुवात होईल, पण 9 ते 12 मे दरम्यान याचा प्रभाव दिसून येईल आणि काही राज्यात पाऊस पडणार आहे, असा अंदाज सांगितला आहे.
दरम्यान गेल्या 2 दिवसांपासूनचे वातावरण बघता पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. पुण्यासह अन्य जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे शहरात मंगळवार आणि बुधवारी हलक्या तीव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, कोल्हापूरसह कोकणात पावसाचा अंदाज वर्तवला (IMD Alert) आहे.
सध्या या चक्रीवादळाचा वेग ताशी 80 ते 90 किमी असून मंगळवारी हा वेग ताशी 100ते 120 किमी इतका वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात पुणे शहरात आर्द्रता पातळी 50 ते 65 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असे IMD अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशातील इतर भागांत उष्णतेच्या लाटेमुळे लोक त्रस्त आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ भाग, राजस्थान, दक्षिण हरियाणा, दक्षिण पंजाब, पश्चिम मध्य प्रदेश आणि जम्मूतील वेगवेगळ्या भागांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.