मुंबई :
कर्नाटक, हरियाना, दिल्ली आणि महाराष्ट्रात कमी असले तरीही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोना राज्य टास्क फोर्सने आता मास्कसक्ती करण्याची शिफारस मंत्र्यांकडे केली आहे. अशातच आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत दिले आहेत.
आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका मात्र कायम आहे. जून, जुलै महिन्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.
काल राज्यात 224 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 196 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 3451 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 635 इतकी झाली आहे. त्याचा आदल्या दिवशी देशात 3805 नवीन कोरोनाबाधितांची नोद आणि 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता.