मुंबई :
तुम्ही जर अँड्रॉइड यूजर असाल आणि कॉल रेकॉर्डिंगसाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. उद्यापासून हे कॉल रेकॉर्डिंग अॅप्स चालणार नाहीत. गुगल प्ले स्टोअरच्या नवीन नियमानुसार कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असलेले अँड्रॉईड अॅप्स बुधवारपासून बंद होणार आहेत. Google Play Store मधील नव्या बदलांमुळे कॉल रेकॉर्डिंग अॅप्स Android फोनवर काम करणार नाहीत.
Google ने Play Store च्या धोरणात काही बदल केले आहेत आणि हे बदल उद्यापासून म्हणजेच 11 मे पासून लागू होतील. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे Android प्लॅटफॉर्मवरील कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद करणे, हा आहे. अगदी Truecaller वापरकर्ते त्यांच्या अँड्रॉइड फोनवर रेकॉर्डिंग फीचर वापरू शकणार नाहीत. कंपनीनं यापूर्वीच यासंदर्भातील माहिती दिली होती.
सुरक्षेच्या कारणास्तव कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद केली जाणार आहेत. कॉल रेकॉर्डिंग अॅप्स अनेक प्रकारच्या परवानग्या घेतात. त्याचा अनेक डेव्हलपर्स चुकीचा फायदा घेतात, असं कंपनीनं म्हटलंय. वैयक्तिक माहितीचा गैरफायदा घेतला जाऊ नये, म्हणून कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद केले जात आहेत. कॉल रेकॉर्डिंगबाबतही वेगवेगळ्या देशांमध्ये कायदे वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्यांनाही तडा जात आहे, असे समोर आले आहे.
गुगलच्या नवीन धोरणामुळे बुधवारपासून कॉल रेकॉर्डिंग अॅप पूर्णपणे बंद होणार आहेत. या धोरणाची Truecaller ने देखील पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या अॅपचे वापरकर्ते यापुढे कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत. ज्या स्मार्टफोन्समध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग अॅप्स देण्यात आली आहेत, ती मात्र काम करत राहणार आहेत. जर तुमच्या मोबाइलमध्ये पहिल्यापासून ही अॅप्स आहेत तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.