आज 10 मे.. जलसंधारण दिन.. महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.. म्हणजेच कोरडवाहू आहे. पाण्याशिवाय शेतीची कल्पनाही करु शकत नाही.. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब ना थेंब अडवणे काळाची गरज असल्याचे ओळखून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत.
‘जलसंधारण दिन’ महाराष्ट्रात साजरा केला जातो.. मात्र, या खास दिवसामागे एक इतिहास आहे.. राजकीय नेत्यांची दूरदृष्टी आहे.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
जलसंधारण दिनाचा इतिहास
दुष्काळावर मात करायची असेल, अधिकाधिक कृषी क्षेत्र नियोजनबद्ध सिंचनाखाली आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री व प्रख्यात जलतज्ज्ञ सुधाकरराव नाईक यांनी आपले संपूर्ण आयुष्य जलसंधारणासाठी वेचले.. त्यामुळे त्यांची ओळख ‘पाणीदार माणूस’ अशी केली जाते. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा त्यांचाच मूलमंत्र..
‘पाण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर महाराष्ट्राचा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही…’ असं सुधाकरराव नाईक म्हणत. जलसंधारणाच्या चळवळीसाठी नाईक यांनी स्वतःला एवढं झोकून दिलं होतं, की कोकण दौऱ्यात त्यांनी तब्येतीकडेही लक्ष दिलं नाही नि त्यातच त्यांचे 10 मे 2001 रोजी निधन झाले..
सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 10 मे हा दिवस जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून महाराष्ट्रात हा दिवस साजरा केला जातो..
असे करा जलसंवर्धन
– पावसाचे पाणी साठविणे, म्हणजेच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे होय. त्यात छतावर पडणारे पावसाचे पाणी टाकीत साठविले जाते. अशा स्वरूपात साठविलेले पाणी मुबलक प्रमाणात आपल्याला वापरता येते.
– तसेच विहिरीचे पुनर्भरण करणे, नद्यांमधील प्रदूषण थांबविणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे यालाच जलसाक्षरता म्हणतात.
– जलव्यवस्थापन या शब्दप्रयोगात व्यवस्थापन, जलसाठवण, जलनियोजन इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत.
– एखाद्या निर्मितीमधील सुबकता, सुलभता, वैज्ञानिकता, उपयुक्तता अंतर्भूत करण्याच्या प्रक्रियेला कौशल्य मानून जलव्यवस्थापन करणेही आज काळाची गरज आहे.
– प्रत्येकाने प्रत्येक वेळी शासनाला जबाबदार न धरता भविष्यात पाण्याचे संकट टाळण्यासाठी पाण्याचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे. तेव्हाच प्रत्येकाची तहान पाण्याने भागेल. अन्यथा पाण्यासाठी वणवण फिरावे लागेल. म्हणून प्रत्येक नागरिकाने पाण्याचे महत्त्व जपले पाहिजे.