SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हवामान विभागाचा ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी अलर्ट; उष्णतेची लाट ठरू शकते जीवघेणी

मुंबई :

गावापासून शहरापर्यंत सगळीकडेच सगळ्यांना उन्हाने हैराण करून सोडले आहे. शेतकऱ्यांना तर कडक उन्हातान्हात राबावे लागत आहे. शहरात मजुरी काम करणाऱ्या लोकांचीही तीच परिस्थिती आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिने लागले की चर्चांपासून वृत्तपत्रांच्या हेडलाइन्सपर्यंत तापमानाचा आकडा हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो. यंदा तर झेंड्यापासून देवापर्यंत विविध विषयांवर राजकारण चालू आहे. देशात राजकीय गरमागरमी सुरू असतानाच लोकांना निसर्गाचे चटके बसत आहेत. नागपूरपासून पुण्यापर्यंत सगळीकडे उष्णतेची लाट आलेली दिसत आहे.

Advertisement

उष्माघाताचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. जवळपास 25 बळी महाराष्ट्रात उष्माघाताने घेतलेले आहेत. अशातच हवामान विभागाने एक मोठा अलर्ट दिला आहे. पुढचे 3 दिवस तापमानाचा पारा वाढलेलाच राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यात पुढील 3 दिवस यलो अलर्ट राहणार आहे.

महाराष्ट्रातील चंद्रपूर हे जगातील सगळ्यात उष्ण ठिकाण ठरले आहे. दक्षिण कोकणात 10 ते 12 मे दरम्यान, तर पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.

Advertisement

काय असते उष्णतेची लाट :-

एखाद्या भागात तापमान 45 अंशापेक्षा जास्त असेल तर ‘उष्णतेची लाट’ आणि 47 अंशापेक्षा जास्त असल्यास उष्णतेची ‘तीव्र लाट’ असल्याचं जाहीर करण्यात येतं. सलग दोन दिवस ही परिस्थिती असल्यास उष्णतेची लाट असल्याचं दुसऱ्या दिवशी जाहीर केलं जातं.

Advertisement