सध्या शेतात उन्हाळी कामांना वेग आला असला, तरी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. यंदाच्या पावसाबाबत अनेक अंदाज, तर्क वितर्क नि भविष्यवाणी केल्या जात आहेत.. अशातच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.. उन्हाच्या तप्त झळा नि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
बंगालच्या उपसागरात सध्या असनी चक्रीवादळ (Asni Cyclone) निर्माण झाले आहे. मात्र, या चक्रीवादळामुळे भारतातील माॅन्सूनची (Monsoon) वाट सोपी होणार असल्याचे सांगितले जाते.. असनी चक्रीवादळ शमल्यानंतर कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. त्यामुळे भारतात माॅन्सूनची वाटचाल वेगाने होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे..
असनी चक्रीवादळाचं आज (ता. 9) महाचक्रीवादळात रूपांतर होत आहे. त्यामुळे बुधवारी (ता. 11) व गुरुवारी (ता. 12) कोकणात, तर मध्य महाराष्ट्रात गुरूवारी व शुक्रवारी (ता. 13) जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ओडीशा, बंगाल व आंध्र प्रदेशमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे..
माॅन्सून लवकर येणार..
असनी चक्रीवादळामुळं माॅन्सून 17 मेपर्यंत अंदमानात येईल, तर केरळात 28 मेपर्यंत माॅन्सून पोहोचण्याची शक्यता आहे.. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा काही दिवस आधीच भारतात माॅन्सून दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे..
असनी’ चक्रीवादळ पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ विशाखापट्टणमपासून 940 किमी, तर ओडिशातील पुरीपासून 1000 किमी अंतरावर असल्याचे समजते. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला हे चक्रीवादळ उद्या (10 मे) धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मच्छिमारांना 10 मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. ओडिशाच्या किनारपट्टीलगतच्या समुद्राच्या स्थितीत 9 व 10 मे रोजी बदल दिसतील. 10 मे रोजी समुद्रातील वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले..