‘कौन बनेगा करोडपती’.. छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय शो.. सर्वसामान्य माणसाला करोडपती होण्याचं स्वप्न दाखवणारा कार्यक्रम.. बाॅलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यामुळे या ‘शो’ला चार चाॅंद लागले.. ‘कौन बनेगा करोडपती’ या ‘शो’चे पुढील पर्व लवकरच येणार असल्याचे सांगितले जाते..
सामान्य लाेकांच्या भावनांशी खेळ करुन काही भामटे या ‘शो’च्या नावाखाली लोकांना लूटत असल्याचे समोर आलंय.. त्यासाठी चांगले सावज हेरुन मोबाईलवर मेसेज किंवा कॉल करून ठगण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्हालाही असा एखादा मेसेज आला असेल किंवा येत असेल, तर वेळीच सावध व्हा.. अन्यथा तुम्हीही हातोहात फसवले जाऊ शकता..
नेमकं कशा पद्धतीनं हा प्रकार सुरु आहे, नागरिकांना कसा गंडा घातला जातो नि त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
कसं फसवलं जातं..?
सध्या अनेक जण ऑनलाईन पेमेंट करीत असतात. हीच बाब हेरुन सायबर चोरांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या (KBC) नावाखाली लोकांना गंडा घालण्याचा उद्योग सुरु केलाय. त्यासाठी नागरिकांना ‘व्हॉटस अॅप’द्वारे मेसेज किंवा ‘व्हॉटस अॅप कॉल’ करून प्रलोभने दाखवली जातात.
‘केबीसी’त लॉटरी लागल्याचा ‘मेसेज’ अथवा ‘व्हॉटस अॅप कॉल’ (whats app) केला जातो. ‘तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागलीय. देशातील 5000 नागरिकांमधून तुमचा मोबाईल नंबर ‘सिलेक्ट’ झाला आहे. ही लॉटरी मिळवण्यासाठी तुम्हाला लॉटरी मॅनेजरला व्हॉटस अॅप कॉल करावा लागेल. ते तुम्हाला लॉटरी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगतील, अशी माहिती दिली जाते..
दरम्यान, तुम्हालाही असा मेसेज आला असल्यास, सावध व्हा.. अशा मेसेजमुळे तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. अशा प्रकारचे मेसेज पूर्णपणे बनावट असून, अशा कोणत्याही ‘लकी ड्रॉ’चे आयोजन ‘केबीसी’तर्फे केले जात नाही. ‘केबीसी’चा कार्यक्रम सुरु असतानाही अशा बनावट मेसेजबाबत नागरिकांना सावध केले जातं.
काय काळजी घ्याल..?
- तुम्हालाही अशा प्रकारचा मेसेज आल्यास त्याला कोणताही रिप्लाय करू नका. मेसेजमध्ये सांगितलेली प्रोसेस फॉलो करू नका.
- अनोळखी लोकांशी संपर्क साधू नका. कोणतेही पेमेंट करू नका.
- मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीसोबत कोणत्याही परिस्थितीत बँक खात्याबाबतची माहिती शेअर करू नका. चुकून अशी माहिती सांगितली असेल, तर तातडीने बँकेला माहिती द्या..
- असा मेसेज आलेला असल्यास, CyberCrime.gov.in पोर्टलवर रिपोर्ट करू शकता.