इंडियन प्रीमियर लिग.. अर्थात ‘आयपीएल’.. जगातील सर्वात मोठ्या लिगपैकी एक.. या स्पर्धेत खेळायला मिळणं म्हणजे भाग्यच.. तसंच या लिगने अनेकांचे भाग्य उजळले.. देशाच्या कानाकोपऱ्यात खितपत पडलेलं टॅलेंट जगासमोर आणलं.. नि एका रात्रीत हे खेळाडू स्टार झाले..
‘आयपीएल’मधील अशा खेळाडूंच्या यादीत सोमवारी (ता. 2) आणखी एक नाव जोडले गेले.. रिंकू सिंह असं या खेळाडूचं नाव.. उत्तर प्रदेशमधील अलीगढचा हा रहिवाशी.. मात्र, त्याच्या बॅटच्या तडाख्यात काल (सोमवारी) ‘राजस्थान राॅयल्स’चे बाॅलर सापडले नि रिंकूने त्यांचा पार कचरा करुन टाकला.. अवघ्या 23 चेंडूत त्यानं नाबाद 42 धावा चोपल्या.
खरं तर 2018 मध्येच रिंकूनं ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, आतापर्यंत हे नाव कोणाला माहिती नव्हतं.. गेल्या पाच वर्षात तो ‘राजस्थान’विरुद्ध ‘आयपीएल’ करिअरमधील फक्त 13वी मॅच खेळत होता. कारण, त्याला नियमित संधीच मिळत नव्हती. ती संधी त्याला राजस्थानविरुद्ध मिळाली नि रिंकूनं संधीचं सोनं केलं..
विशेष म्हणजे, ‘राजस्थान’विरुद्धच्या सामन्याआधी रात्री झोपताना रिंकूने हातावर लिहिलं की, ’50 धावा नॉट आउट…’ त्यानंतर सामन्यात त्याची फिफ्टी झाली नसली, तरी तो 42 धावांवर नाबाद राहिला.. ‘मला मनातून वाटत होतं, की मी आज धावा करेन आणि ‘मॅन ऑफ द मॅच’ होईन, म्हणूनच स्वत: हातावर 50 धावा लिहून त्याला ‘हार्ट’ तयार केलं होतं..’ असं तो म्हणाला..
Said it. Did it. 👊@rinkusingh235 #KKRHaiTaiyaar #KKRvRR #IPL2022 pic.twitter.com/3q3xgyoIOC
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 2, 2022
Advertisement
रिंकूची पार्श्वभूमी…
रिंकू पाच भावंडांमध्ये तिसरा… अत्यंत वाईट गरीबीतून तो वर आलाय.. रिंकूचे वडील खानचंद्र आजही अलीगडमध्ये घराेघर ‘एलपीजी’ सिलिंडर पोहोच करण्याचं काम करतात. रिंकूचा मोठा भाऊ ऑटो रिक्षा चालवतो, तर दुसरा भाऊ कोचिंग सेंटरमध्ये काम करतो.
रिंकूच्या कुटुंबाला त्याचं क्रिकेट खेळणं आवडत नव्हते, पण 2012 मध्ये रिंकूनं शाळेच्या स्पर्धेत ‘बाईक’ जिंकली, नि कुटुंबाचे मत बदलले. रिंकूला बक्षीस म्हणून मिळालेली मोटारसायकलच त्याचे वडील सिलिंडर वाहण्यासाठी करतात. रिंकू नववीत नापास झाला, शिक्षण न झाल्याने चांगली नोकरी मिळत नव्हती. अखेर एके ठिकाणी त्याला झाडू मारण्याची नोकरी मिळाली.
मात्र रिंकूनं क्रिकेटवरच फोकस करण्याचं ठरवलं. 2015 मध्ये त्याच्या कुटुंबावर 5 लाखांचे कर्ज होतं. उत्तर प्रदेश अंडर-19 संघाकडून खेळताना मिळालेले भत्ते, अन्य पैसे एकत्र करून त्यानं हे कर्ज फेडले. 2022 मध्ये झालेल्या ‘मेगा
ऑक्शन’मध्ये ‘केकेआर’ने त्याला 55 लाखांना खरेदी केलं नि बॅट हातात आल्यावर आपण काय करू शकतो, हे रिंकूनं सर्वांना दाखवून दिलं..