‘उधार द्या, मदत करा, मात्र कोणालाही जामीनदार राहू नका..’ असं म्हटलं जातं नि हे म्हणणं तितकंच खरंय.. कारण, त्याचे प्रत्यंतर हल्ली अनेकांना येते. जवळच्या मित्रासाठी, नातेवाईकांसाठी अनेक जण मागचा-पुढचा विचार न करता, जामिनदार होतात नि फसतात.. नंतर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते..
खरं तर तुमचं उत्पन्न नि क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असेल, तर कोणतीही बॅंक तुम्हाला सहज कर्ज देते. परंतु, क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, उत्पन्नाचा खात्रीशीर स्रोत नसेल किंवा कर्जफेडीचा तुमचा मागील रेकॉर्ड चांगला नसल्यास बँकांकडून जामीनदाराची (Loan Guarantor) मागणी केली जाते..
जामीनदाराची व्याख्या अगदी स्पष्ट आहे… कर्जदार कर्जाची परतफेड करील, पण त्याने कर्जफेड न केल्यास हमीदार म्हणून मी कर्जाची परतफेड करेल, अशी हमीच जामीनदार बँकेला देत असतो. जामीनदाराच्या भरोशावरच बॅंका कर्जदारास कर्ज देण्यास तयार होतात.. मात्र, जामीनदार होण्यापूर्वी त्यातील प्रत्येक पैलू नीट समजून घेणे आवश्यक आहे.
जामीनदार होण्यापूर्वी ‘या’ गोष्टी पाहा..
जामीनदाराचे प्रकार – कर्ज देण्यासाठी बँका दोन प्रकारचे जामीनदार मागतात. एक म्हणजे गैर-आर्थिक हमीदार नि दुसरा आर्थिक हमीदार.. पहिल्या प्रकारात तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जातो, तर दुसऱ्या प्रकारात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाते..
क्रेडिट हिस्ट्री तपासा – जवळच्या माणसासाठी जामीनदार होण्यापूर्वी तुम्ही त्या व्यक्तीला चांगलं ओळखता का, हे पाहा. तसेच, आतापर्यंत त्याने कुठे कर्ज बुडवले तर नाही ना, याचाही माहिती घ्या.. थोडक्यात त्याची कर्ज परतफेडीची हिस्ट्री पाहा..
हेही पाहा –
- कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ केल्यास, त्याच्या कर्जाचे पैसे भरण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. तुम्ही कर्ज न घेताही अडचणीत येऊ शकता.. तुमची संपत्ती धोक्यात येऊ शकते.
- कर्जदार लोन डिफॉल्टर झाल्यास, त्याचा क्रेडिट स्कोअर खराब होतोच, पण तुमच्याही क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.. त्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळविण्यात अडचणी येऊ शकतात.
या कर्जासाठी व्हा जामीनदार – जामीनदार होणारच असाल, तर शक्यतो गृहकर्ज, वाहन कर्जासाठी जामीनदार व्हा. कारण, त्यात कर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरले नाही, तर बँक जामीन म्हणून ठेवलेल्या वस्तू, म्हणजेच घर, गाडी ताब्यात घेऊ शकते. पर्यायाने कर्ज फेडायची जबाबदारी तुमच्यावर येत नाही.