मुंबई :
सार्वजनिकमधून खासगी बँकेत रूपांतरित झालेल्या आयडीबीआय बँकेने फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरामध्ये बदल केले आहेत. दोन कोटी रुपयांहून कमी रक्कम असलेल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरांत आयडीबीआय बँकेनं बदल केला आहे. बँकेने 31 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीचे व्याजदर बदलले आहेत. या बदलांनंतर बँक 6 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या एफडीवर 2.70 ते 5.60 टक्क्यांपर्यंत व्याज देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयडीबीआय बँकनी स्पेशल इंटरेस्ट रेट ऑफर केले आहेत.
आयडीबीआय बँकेनं 7 दिवसांपासून ते 30 दिवसांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांहून कमी डिपॉझिटवर 2.70 टक्के व्याज कायम ठेवलं आहे. परंतु, बँकेनं 31 ते 45 दिवसांच्या एफडीवरचे व्याजदर वाढवले असून, या कालमर्यादेत बँक 3 टक्के व्याज देणार आहे. पूर्वी व्याजदर 2.80 टक्के होते. 45 ते 60 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीचे व्याजदर 3.25 टक्के असतील. यामध्ये 25 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. या कालमर्यादेच्या एफडीसाठी पूर्वी 3 टक्के व्याजदर होते. तसंच 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.40 टक्के व्याजदर मिळणार आहे. यामध्ये 40 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. बँकेनं 2 ते 3 वर्षांच्या कालमर्यादेत मॅच्युअर होणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर 5.25 टक्क्यांवरून 5.35 टक्के केले आहेत. तर 3 ते 5 वर्षांच्या एफडीचे व्याजदर 5.40 वरून वाढवून 5.50 टक्के केले आहेत.
आयडीबीआय बँकेकडून नमन सीनिअर सिटिझन डिपॉझिट स्किमअंतर्गत ज्येष्ठांना वार्षिक 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे. तसंच रेसिडेंट सीनिअर सिटिझन्स ग्राहकांना 0.25 टक्के जास्त व्याज मिळणार आहे. म्हणजेच ज्येष्ठ ग्राहकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे. या स्किमचा लाभ 30 सप्टेंबर 2022 पर्यंत घेता येणार आहे. सिटिझन्सच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 3.20 ते 6.35 टक्के व्याजदर देते. 5 वर्षे डिपॉझिटसारख्या सुविधा टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड योजनेचे व्याजदर 10 बेसिस पॉइंटनं वाढून ते 5.60 टक्के झाले आहेत.