वाढत्या महागाईने आज प्रत्येक जण हैराण झालाय.. इंधन दरवाढ, गॅसवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकाचा खिसा रोजच कापला जातोय.. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आधी बजेटचा विचार केला जातो.. पेट्रोलचे दर शंभरी पार झाल्यावर तर अनेकांनी आपल्या गाड्या घरातच पार्क केल्या…
पेट्रोलनंतर आणखी एक गोष्ट आहे, ज्याच्या दरवाढीवर सामान्य माणूस खरं तर आश्चर्य व्यक्त करतोय, कारण कधी नव्हे इतका दर या वस्तूचा झालाय.. ही गोष्ट म्हणजे अर्थातच लिंबू… एरवी 20-30 रुपयांना मिळणाऱ्या लिंबाचा भाव चक्क 200 रुपये किलोवर गेल्याने सामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आलीय..
लिंबाची किंमत पाहून एका दुकानदाराने अनोखी शक्कल लढवलीय.. त्याने आपल्या वस्तूंवर चक्क लिंबू नि पेट्रोल फ्री देण्याचा निर्णय घेतलाय.. हा प्रकार सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
नेमका प्रकार काय..?
हा दुकानदार उत्तर प्रदेशमधील आहे.. यश जयस्वाल असं त्याचं नाव… वाराणसीच्या लहुराबीरमध्ये त्याची मोबाईल शाॅपी आहे.. गेल्या काही दिवसांत पेट्रोल व लिंबाचे वाढलेले दर पाहून या यशने अनोखी शक्कल लढवली..
मोबाईल अॅक्सेसरीजच्या खरेदीवर ग्राहकांना तो चक्क मोफत लिंबू देत आहे. ग्राहकांनाही त्याची लिंबाची ही ऑफर खूप आवडली.. दुकानातून 50 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मोबाईल अॅक्सेसरीज खरेदी केल्यास 2 लिंबू मोफत देत आहे. लिंबाच्या किमती सामान्य होत नाहीत, तोपर्यंत ही ऑफर सुरू ठेवणार असल्याचे त्याने सांगितले.
मोबाईलवर पेट्रोल फ्री..
सध्या वाराणसीमध्ये पेट्रोलची किंमत 106.07 रुपये प्रति लिटर आहे. शिवाय एक लिटर डिझेलसाठी 97.63 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे यशने त्याच्या दुकानात लिंबूच नाही, तर मोफत पेट्रोलची ऑफरही सुरू केली. त्यानुसार, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मोबाईल खरेदी केल्यास, ग्राहकांना एक लिटर पेट्रोल मोफत दिले जाते.
यशच्या मोबाईल खरेदीवर एक लिटर पेट्रोलची ऑफरही हिट ठरलीय. ग्राहकांना या दोन्ही ऑफर आवडल्याने, दुकानातील गर्दी वाढल्याचे तो म्हणतो..
सध्या महागाईमुळे मार्केटमध्ये मंदी आलीय. त्यामुळे वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने ग्राहकांना मोफत लिंबू देण्यास सुरुवात केली. ग्राहकांना ही ऑफर खूप आवडली.. त्यामुळे दुकानातील ग्राहकांची संख्याही वाढल्याचे यशने सांगितले..