सोमवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) ने Amway India या कंपनीची मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनेच्या मालकीची 757 कोटींची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत जप्त केली आहे.अॅमवे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडच्या तात्पुरत्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये तामिळनाडूमधील दिंडीगुल जिल्ह्यातील जमीन आणि कारखाना इमारत, प्लांट आणि मशिनरी, वाहने, बँक खाती आणि मुदत ठेवी यांचा समावेश आहे.
आर्थिक घोटाळ्याच्या नावाखाली ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने कंपनीच्या पाच ऑफिसवर छापेमारी केली. ईडीला तपासादरम्यान आढळले की, अॅमवे (Amway) कंपनी नेटवर्क मार्केटींगच्या (Network Marketing) च्या नावाखाली ‘पिरॅमिड फ्रॉड’ करत होती.
कंपनीच्या यादीत आणखी सदस्य जोडून त्यांची कागदावरच विक्री करत असल्याचे तपासात समोर आलं आहे. कंपनीचे सदस्य होऊन लोक श्रीमंत होन्याचे आमिष दाखवून कंपनीकडून मल्टीलेवल मार्केटींग सुरु होती.
कंपनी उत्पादनांकडे लक्ष देत नाही. मल्टीलेवल मार्केटींग हा कंपनीचा मूळ उद्देश असून कंपनीचे संपूर्ण लक्ष लोक सभासद बनून कसे श्रीमंत होतील याच्या प्रचारावर आहे.
कंपनीने 2002 2022 या कालावधीत आपल्या व्यवसायातून 27,562 कोटी जमा केले आहेत. यापैकी कंपनीनं भारत आणि अमेरिकेतील सदस्य आणि वितरकांना 7588 कोटी रुपयांचं कमिशन दिलं आहे. ईडीने केलेल्या कारवाईवर, अॅमवे इंडियाने निवेदनात म्हटलं आहे की, ‘ईडीची कारवाई 2011 च्या तपासाशी संबंधित आहे आणि तेव्हापासून आम्ही ईडीला सहकार्य करत आहोत. आम्ही 2011 पासून वेळोवेळी ईडीने मागितलेली सर्व माहिती दिलेली आहे. आम्ही संबंधित सरकारी अधिकारी आणि कायदा अधिकाऱ्यांना न्यायिक आणि कायदेशीर निष्कर्षासाठी सहकार्य करत राहू. ग्राहक संरक्षण कायदा नियम, 2021 अंतर्गत डायरेक्ट सेलिंगचा अलीकडेच समावेश केल्यानं उद्योगासाठी आवश्यक कायदेशीर आणि नियामक स्पष्टता आली आहे. आम्ही अॅमवे इंडियाच्या वतीने भारतातील कायदा आणि तरतुदींचे पालन करण्याचा पुनरुच्चार करतो.