बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मिळणार 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल; बघा, महाराष्ट्रात कुठे चालूय हा अभिमानास्पद उपक्रम
सोलापूर :
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात व आगळावेगळा साजरा करण्यात येत आहे. यातच सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास पूजा करण्यात आली व बुद्धवंदना करण्यात आली. त्या भागातील लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज सोलापुरात 1 रुपयात एक लिटर पेट्रोल दिलं जाणार आहे. महागाईचा आगडोंब उसळला असताना असा उपक्रम घेणाऱ्या समितीचे सगळीकडे कौतुक होत आहे. मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या इंधनाच्या दरांमध्ये जवळपास दररोज वाढ होत आहे.
अशा परिस्थितीत मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात एक रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापुरातील डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर आजच्या दिवशी नागरिकांसाठी एक रुपयात एक लिटर पेट्रोल उपलब्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने 14 एप्रिल ते 17 एप्रिल असा जयंती उत्सव सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा उपक्रम अभिमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहेत.