मुंबई :
राजकीय पुढाऱ्यांची मुले शक्यतो राजकारणातच उतरतात. राजकारण नाहीच जमले किंवा राजकारणात रस नसेल तर व्यवसायात स्थिरावतात. तसेही राजकारण आणि मनोरंजन विश्वातील लोकांची नावे नेहमीच एकमेकांशी जोडली जातात. मराठमोळा सुपरस्टार रितेश देशमुख याने आधीच बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. रितेश हे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे बडे नेते स्व. विलासराव देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत, हे महाराष्ट्रातील लहान मुलाला सुद्धा माहिती आहे. मात्र आता रितेशनंतर अभिनयात आपली कारकीर्द सजवण्यासाठी अजून एक राजकीय परंपरा असलेल्या घरातून एक मुलगा येत आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम हा आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘तू आणि मी, मी आणि तू’ या चित्रपटातून सोहम मराठी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. निखळ प्रेमासोबत जर मैत्रीही जोपासली तर आयुष्य अगदी खुलून जात, मात्र समाजातल्या काही अघोरी कृत्यांमुळे काहींना आपलं प्रेम गमवाव लागत अशाच काहीशा वेगळ्या धाटणीच्या या चित्रपटातून तो आपल्या भेटीला येणार आहे.
‘सोहमला मिळालेल्या या संधीमागे पूर्णतः त्याचं श्रेय आहे, माझा यात काहीच वाटा नाही. उलट त्याचा हा निर्णय ऐकून मी आश्चर्यचकित झाले, माझ्यासाठी खरंच अत्यंत आनंदाची बातमी आहे, आमच्या कुटुंबात कोणी अद्याप या क्षेत्रात नाही. सोहम वेगळं क्षेत्र निवडून त्यात कामगिरी करत आहे, हे पाहून खूप आनंद होत आहे’, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.